घरफाेडीतील आराेपीच्या मुसक्या आवळल्या; दागिन्यासह सव्वा 7 लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: August 30, 2022 11:17 PM2022-08-30T23:17:20+5:302022-08-30T23:17:55+5:30
औराद पाेलिसांची कारवाई : पाेलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली
लातूर : जिल्ह्यातील औराद शहाजानी (ता. निलंगा) येथे बालाजी मंदिर परिसरात असलेले घर चाेरट्यांनी फाेडून साेन्या-चांदीच्या दागिन्यासह राेकड पळविली हाेती. दरम्यान, घरफाेडीतील आराेपीच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्याच्याकडून जप्त केलेले तब्बल ७ लाख २६ हजारांचे दागिने फिर्यादीला मंगळवारी परत करण्यात आले आहे.
पाेलिसांनी सांगितले, २३ ते २५ जुलै २०२२ रोजीच्या दरम्यान औराद शहाजनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजी मंदिर परिसरात असलेले घर अज्ञात चोरट्यांनी फाेडले. घरात कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण ७ लाख २६ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्याचा तपासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, घरफाेडीत चाेरट्यांनी लंपास केलेला मुद्देमाल आणि आरोपीच्या शोधासाठी पाेलिसांनी विविध ठिकाणी शाेधमाेहीम राबविली.
खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला २५ जुलैरोजी ताब्यात घेतले. अधिक चाैकशी करत झाडाझडती घेतली असता, त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि राेख ५० हजार रुपये असा एकूण ७ लाख २६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल आराेपीने पाेलिसांकडे जमा केला.
फिर्यादीला परत केला मुद्देमाल...
दरम्यान, कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर चाेरीलला गेलेले साेन्याचे दागिने, राेख रक्कम असा एकूण ७ लाख २६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल मंगळवार, ३० ऑगस्ट राेजी अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, सपोनि. संदीप कामत यांच्या उपस्थितीत फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आला