सूर्यनारायणाच्या रौद्ररुपामुळे पशुधनात कृत्रिम रेतन घटले; जनावरांत गर्भपाताचा धोकाही वाढला

By हरी मोकाशे | Published: May 31, 2023 07:01 PM2023-05-31T19:01:07+5:302023-05-31T19:01:32+5:30

पशुधनात गर्भधारणा राहण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी सर्वात चांगला असतो.

Artificial insemination in livestock decreased due to Suryanarayana's raudra form; The risk of abortion in animals also increased | सूर्यनारायणाच्या रौद्ररुपामुळे पशुधनात कृत्रिम रेतन घटले; जनावरांत गर्भपाताचा धोकाही वाढला

सूर्यनारायणाच्या रौद्ररुपामुळे पशुधनात कृत्रिम रेतन घटले; जनावरांत गर्भपाताचा धोकाही वाढला

googlenewsNext

लातूर : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जीवाची काहिली होत आहे. या उन्हाचा परिणाम पशुधनाच्या कृत्रिम रेतनावर ही झाला आहे. एप्रिलमध्ये केवळ २ हजार ५०६ पशुधनावर कृत्रिम रेतन झाले आहे. दरम्यान, जनावरांमध्ये गर्भपाताचा धोकाही अधिक वाढला आहे. त्यामुळे पशुधनाची काळजी घेणे अधिक गरजेचे ठरत आहे.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालनाकडे वळावे म्हणून शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात पशुधन संख्या वाढत आहे. त्यामुळे पशुपालकांची आर्थिक प्रगती होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात मोठे पशुधन जवळपास ५ लाख आहे. त्यात गायवर्गीय २ लाख ५५ हजार तर म्हैस वर्गीय २ लाख ५७ हजार अशी संख्या आहे. पशुधनात रोगराई निर्माण होऊ नये तसेच आनुवंशिक सुधारणा व्हावी म्हणून पशुसंर्वधन विभागाच्या वतीने पशुधनावर कृत्रिम रेतन करण्यात येते. त्यामुळे जनावरांवर भविष्यात होणारे धोकेही टाळण्यास मदत होते.

हिवाळा ऋतू पशुधनास पाेषक...
पशुधनाचा गर्भधारणेचा कालावधी १० महिने १० दिवस असतो. पशुधनात गर्भधारणा राहण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी सर्वात चांगला असतो. कारण पशुधनास मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होतो. त्यामुळे जन्मलेल्या वासरास अथवा कालवडीस पुरेशाच्या प्रमाणात आईचे दूध मिळते.

उन्हाळ्यात कृत्रिम रेतन कमी...
पशुधनाच्या गर्भधारणेसाठी थंडीचा कालावधी अधिक चांगला असतो. या कालावधीत हिरवा चारा, पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते. उन्हाळ्यात पशुधनाच्या आरोग्यावर काहीसा परिणाम होतो. परिणामी, कृत्रिम रेतनाचे प्रमाणही घटते. शिवाय, जनावरांमध्ये गर्भपाताचा धोकाही असतो. सर्वाधिक कृत्रिम रेतन नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत होते.
- डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

जनावरांचा उन्हापासून करा बचाव...
यंदाचा उन्हाळा अधिकच तीव्र आहे. त्यामुळे पशुपालकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. पशुधनास उन्हात उघड्यावर बांधू नये. पाळीव पशुधनास पार्क केलेल्या गाडीत सोडून जाऊ नये. शेतीसाठी आणि इतर कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नये. पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फार दूर व फार वेळ चालावे लागू नये, याची दक्षता घ्यावी. पशुधन दाटीवाटीने बांधू नये. भर उन्हात पशुधनाची वाहतूक करु नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

जिल्ह्यात वर्षभरातील कृत्रिम रेतन...
मे -२०२२ - ३२५२
जून- ४९७९
जुलै ४६६३
ऑगस्ट ५०८९
सप्टेंबर ४८३८
ऑक्टोबर ६०८९
नोव्हेंबर ७६०४
डिसेंबर ७९५७

जानेवारी २०२३- ७०४२
फेब्रुवारी ६७५०
मार्च ८०९१
एप्रिल २५०६

Web Title: Artificial insemination in livestock decreased due to Suryanarayana's raudra form; The risk of abortion in animals also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.