लातूर जिल्ह्यात ९९ वर्षांपुढील तब्बल अडीच हजार मतदार; तर २३ हजार नवमतदारांची भर

By संदीप शिंदे | Published: January 19, 2023 04:04 PM2023-01-19T16:04:03+5:302023-01-19T16:05:10+5:30

अंतिम मतदार यादी : साडेसहा हजार नावे वगळली, वर्षातून चार वेळेस नाेंदणी होत असल्याने प्रतिसाद वाढला

As many as 2500 voters above 99 years in Latur district; So the addition of 23 thousand new voters | लातूर जिल्ह्यात ९९ वर्षांपुढील तब्बल अडीच हजार मतदार; तर २३ हजार नवमतदारांची भर

लातूर जिल्ह्यात ९९ वर्षांपुढील तब्बल अडीच हजार मतदार; तर २३ हजार नवमतदारांची भर

Next

- संदीप शिंदे
लातूर :
निवडणुक विभागाने वर्षभर मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम राबविली आहे. त्यानुसार ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये २३ हजार ५५ मतदारांची वाढ झाली आहे. तर ६ हजार ४८८ नावे वगळण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांची संख्या १९ लाख १४ हजार ५८८ वर पोहचली आहे. दरम्यान, यामध्ये १८२०२ मतदार हे १८ ते १९ वयोगटातील असून, या मतदारांनाही प्रथमच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी १८ लाख ९८ हजार ८१ मतदार होते. यामध्ये ६४२२ जणांची नावे वगळण्यात आली असून, निवडणुक विभागाकडून दरवर्षी मतदार यादी दुरुस्ती, नाव नोंदणीसाठी मोहीम राबविली जाते. पुर्वी १ जानेवारी रोजी १८ वर्षे पुर्ण झालेल्यांनाच नाव नोंदणी करता येत होती. मात्र, आता जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यातही मतदार नाेंदणी करता येत आहे. त्यानुसार महाविद्यालयांमध्येही नोंदणीसाठी शिबिरे घेण्यात आली. परिणामी, नवमतदारांची संख्या २३ हजारांनी वाढली आहे.

अंतिम मतदार यादीनुसार लातूर ग्रामीण मतदारसंघात २४५९, लातूर शहरात ३६४९, अहमदपूर ५५३९, उदगीर ५१८२, निलंगा ३२४९, औसा मतदारसंघात २९७७ असे एकूण २३ हजार ५५ नवमतदार झाले असून, यामध्ये ११ हजार ८५५ पुरुष तर ११ हजार १७० महिला मतदार तर ३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असल्याचे जिल्हा निवडणुक विभागाकडून सांगण्यात आले.

९९ वर्षांपुढील अडीच हजार मतदार...
जिल्ह्यात ९९ वर्षांपुढील २ हजार ६६९ मतदार आहेत. यामध्ये लातूर ग्रामीण ७४१, लातूर शहर ६१०, अहमदपूर ३९७, उदगीर ३०८, निलंगा ४६० तर औसा तालुक्यातील १५३ मतदारांचा समावेश आहे. यामध्ये ११७५ पुरुष तर १४९४ महिला मतदार आहेत. तर ९० ते ९९ वयोगटात १८ हजार ३०१ मतदार असून, यामध्ये पुरुष ८३६४ तर ९९३७ महिला मतदारांचा समावेश आहे.

मतदारसंघनिहाय अशी आहे मतदारांची संख्या...
अंतिम मतदार यादीनुसार लातूर ग्रामीणमध्ये ३ लाख २१ हजार ५०९, लातूर शहर ३ लाख ६५ हजार ८९४, अहमदपूर ३ लाख २५ हजार ७५४, उदगीर २ लाख ९६ हजार ६८४, निलंगा ३ लाख १८ हजार ३६४ तर औसा मतदारसंघात २ लाख ८६ हजार ३८३ असे एकूण १९ लाख १४ हजार ५८८ मतदार झाले आहेत. यामध्ये ३२ तृतीयपंथी मतदार आहेत.

विविध शिबिरांमुळे नावनोंदणीत वाढ...
जिल्हा निवडणुक विभागाच्या वतीने महाविद्यालयांत नावनोंदणीसाठी विशेष शिबिर घेण्यात आले. तसेच दिव्यांग, तृतीयपंथी, महिलांसाठी मेळावेही घेण्यात आले. त्यामुळे नावनोंदणीस चांगला प्रतिसाद मिळाला असून, २३ हजार नवमतदारांची वाढ झाली आहे. तर पडताळणी करुन ६४८८ नावे वगळण्यात आली आहेत. 
- डॉ. सुचेता शिंदे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी, लातूर

अशी वाढली नवमतदारांची संख्या...
मतदारसंघ पुरुष स्त्री

लातूर ग्रामीण १३३१ - ११२८
लातूर शहर १८०३ - १८४६
अहमदपूर            २८३३ - २७९६
उदगीर             २६१२ - २५७०
निलंगा             १६८२ - १५६७
औसा             १६२४ - १३५४
एकूण             ११८८५ - १११७०

Web Title: As many as 2500 voters above 99 years in Latur district; So the addition of 23 thousand new voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.