न्यायालयाच्या आदेशानुसार लातुरात अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ
By हणमंत गायकवाड | Published: May 4, 2023 07:32 PM2023-05-04T19:32:30+5:302023-05-04T19:33:17+5:30
व्यावसायिकांनी स्वतः अतिक्रमणे काढून घेण्याचे मनपाचे आवाहन
लातूर : शहरातील गंजगोलाई परिसर व या भागाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यास महानगरपालिकेने गुरुवारपासून प्रारंभ केला आहे. दरम्यान, व्यावसायिकांनी आपापली अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावीत, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
गंजगोलाई व त्या परिसरातील सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहेत. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याचिका क्रमांक ९६६९/२०१७ व ११५७२/२०१७ या दोन्ही याचिकांवर न्यायालयाने सुनावणी घेतली. ही अतिक्रमणे चार आठवड्यांच्या आत काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ३ मे रोजी दिले आहेत. अतिक्रमणे चार आठवड्यांच्या आत काढून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशात न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार गुरुवारपासून मनपाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.
ज्या व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमणे केली आहेत त्यांनी आपली अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावीत. मनपाकडून अतिक्रमणे काढण्यात आली तर व्यावसायिकांचे साहित्य परत दिले जाणार नाही. नुकसान टाळण्यासाठी व्यावसायिकांनी स्वतःच आपली अतिक्रमणे काढून घेऊन महानगरपालिकेला व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.