जामिनावर सुटताच पुन्हा दुचाकी चोरी, सराईत गुन्हेगारास पाेलिसांनी ठोकल्या बेड्या
By राजकुमार जोंधळे | Published: January 17, 2023 08:10 PM2023-01-17T20:10:45+5:302023-01-17T20:11:10+5:30
चाेरीप्रकरणी एकाला दुचाकीसह अटक केली आहे.
लातूर : दुचाकी चाेरीतील संशयित आराेपी लातूर जिल्हा कारागृहातून जामिनावर सुटला आणि पुन्हा पाेलिसांच्या जाळ्यात अडकला. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चाेरीप्रकरणी एकाला दुचाकीसह अटक केली आहे.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दुचाकी चोरीतील गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या पथकाने दुचाकी चोरीबाबत विशेष मोहीम राबविली. या प्रकरणात पोनि. संजीवन मिरकले यांच्या पथकाला खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीतील संशयित आरोपी हा लातूर जिल्हा कारागृहातून जामिनावर सुटला. हा सराईत गुन्हेगार सुमित दगडू दर्गेवाड असल्याचा अंदाज पाेलिसांना हाेता.
या माहितीची पडताळणी करून सराईत गुन्हेगाराचा त्या-त्या भागात शोध घेतला जात हाेता. दरम्यान, दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित सुमित दगडू दर्गेवाड (वय २५, रा. मळवटी रोड, लातूर) याला एमआयडीसी पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक सखोल चाैकशी केली असता, श्याम नगरातून दुचाकी चाेरल्याचे त्याने कबूल केले. त्याने चोरलेली १ लाख १० हजारांची पल्सर मोटरसायकल जप्त केली असून, त्याला अटक केली आहे. चोरीच्या गुन्ह्यामध्ये लातूर जिल्हा कारागृहातून जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराला दुसऱ्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पाेलिसांनी अटक केली असून, त्याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवन मिरकले, पोउपनि. संदीप कराड, अंमलदार बेल्लाळे, प्रताप वांगे, अर्जुन राजपूत, गोविंद चामे, शिंगाळे, शिंदाडकर, जाधव यांच्या पथकाने केली.