स्वतःची जागा नसल्याने लातूर मनपा उभारतेय भाड्याच्या इमारतीत आरोग्य मंदिरे !

By हणमंत गायकवाड | Published: January 5, 2024 06:00 PM2024-01-05T18:00:34+5:302024-01-05T18:00:55+5:30

प्रस्तावांची छाननी : दवाखान्यासाठी भाड्याने इमारत देण्यास ४६ इच्छुक

As there is no place of its own, Latur Municipal Corporation is setting up health temples in rented buildings! | स्वतःची जागा नसल्याने लातूर मनपा उभारतेय भाड्याच्या इमारतीत आरोग्य मंदिरे !

स्वतःची जागा नसल्याने लातूर मनपा उभारतेय भाड्याच्या इमारतीत आरोग्य मंदिरे !

लातूर : राज्य शासनाकडून लातूर मनपाला पहिल्या टप्प्यात १२ आणि दुसऱ्या टप्प्यात ११ असे एकूण २३ आरोग्य मंदिरे आणि दोन आपले दवाखाने मंजूर झाले आहेत. त्यापैकी नऊ आरोग्य मंदिरे आणि दोन आपले दवाखाने कार्यान्वित झाले आहेत. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील ११ आरोग्य मंदिरांसाठी इमारत भाड्याने घेतली जाणार असून त्यासाठी ४६ जणांनी जागा अर्थात इमारत भाड्याने देण्यासाठी मनपाकडे प्रस्ताव दिले आहेत. त्याची छाननी होत असून इमारत पसंत पडल्यानंतर त्या ठिकाणी लवकरच आरोग्य मंदिरे होणार आहेत.

आरोग्य मंदिरात या आणि मोफत उपचार घ्या, असा उपक्रम शासनाचा असून त्यासाठी लातूर मनपाला २५ आरोग्य मंदिरे मंजूर झाले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील अकरा आरोग्य मंदिरे कार्यान्वित झाले आहेत. ठाकरे चौक, खोरी गल्ली, सावेवाडी, शिवाजी हाउसिंग सोसायटी, सुभेदार रामजी नगर, एमआयडीसी, ठाकरे चौक, आनंद नगर, संजय नगर, काळे गल्ली, वैशाली बुद्ध विहार आदी अकरा ठिकाणी आरोग्य मंदिर आणि आपला दवाखाने नागरिकांच्या सेवेत कार्यरत झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात ११ ठिकाणी आरोग्य मंदिर होत असून मनपा त्यासाठी भाड्याने इमारत घेत आहे. त्यासाठी ४६ प्रस्ताव आले असून छाननी सुरू आहे.

भाड्याच्या इमारतीमध्ये ११ आरोग्य मंदिरे थाटली जाणार...
भाड्याच्या इमारतीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील ११ आरोग्य मंदिरात थाटली जाणार आहेत. त्यासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांचे प्रस्ताव घेण्यात आले आहेत. ४६ जणांनी प्रस्ताव दिले आहेत. त्या प्रस्तावांची छाननी सुरू आहे. जिथे आवश्यकता आहे, अशा ठिकाणची जागा फायनल करून त्या ठिकाणी आरोग्य मंदिर सुरू करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात आरोग्य वर्धिनी केंद्र आणि नागरी दवाखाने असले तरी या दवाखान्यांमध्ये फक्त बाह्यरुग्ण सेवा आहे.

मनपाच्या आरोग्य विभागाच्या कार्यरत आरोग्य संस्था.....
प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र : ०८
नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र अर्थात आरोग्य मंदिरे : ०९
बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना : ०२
बाह्य रुग्ण सेवा केंद्र : ०३
लवकरच सुरू होत असलेले आरोग्य मंदिरे : ११

पदभरती लवकरच सुरू होणार....
आरोग्यवर्धन केंद्र अर्थात आरोग्य मंदिरांसाठी लागणारे मनुष्यबळ तत्काळ भरले जाणार आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एमपी डब्ल्यू आदी पदांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील आरोग्य मंदिरांसाठी वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य पदांसाठी भरती करण्यात आलेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील आरोग्य मंदिरांसाठी पदभरती केली जाणार असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

Web Title: As there is no place of its own, Latur Municipal Corporation is setting up health temples in rented buildings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.