आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचा मोर्चा, धरणे आंदोलन
By हरी मोकाशे | Published: October 23, 2023 07:44 PM2023-10-23T19:44:48+5:302023-10-23T19:45:18+5:30
कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी
लातूर: कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी, वार्षिक वेतनवाढ लागू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी गटप्रवर्तकांनी तर ऑनलाईन कामे करण्यासाठी होत असलेली सक्ती त्वरित थांबवावी या मागणीसाठी आशा स्वयंसेविकांनी सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.
महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यात राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हाध्यक्ष रंजना गारोळे, जिल्हा सचिव रेणुका सिंदाळकर यांच्यासह जिल्ह्यातील गटप्रवर्तक, अशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनास टाऊन हॉल येथून प्रारंभ झाला. गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत. गटप्रवर्तकांना दौऱ्यावर आधारित प्रवास खर्च मिळतो. प्रवास खर्चाव्यतिरिक्त त्यांना मासिक निश्चित रक्कम द्यावी. गटप्रवर्तकांना ऑनलाईनची कामे विनामोबदला सांगण्यात येऊ नयेत. गटप्रवर्तकांना दिवाळीपूर्वी एक महिन्याच्या मानधनाएवढा बोनस देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
ऑनलाईन कामे सांगू नयेत...
आशा स्वयंसेविकांना कोणत्याही प्रकारची ऑनलाईन कामे सांगण्यात येऊ नयेत. ऑक्टोबर २०१८ नंतर केंद्र शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ केली नाही. ती वाढविण्यात यावी. मासिक २६ हजार रुपये किमान वेतन द्यावे. आरोग्यवर्धिनीअंतर्गत केलेल्या कामाच्या मोबदल्याची थकबाकी आशा स्वयंसेविकांना त्वरित द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांना देण्यात आले.