आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवून आशा कार्यकर्तीस २४ लाखाला फसविले

By हरी मोकाशे | Published: June 19, 2024 06:52 PM2024-06-19T18:52:08+5:302024-06-19T18:53:12+5:30

या प्रकरणी तिघांवर गुन्हा, एकास पोलिसांनी केली अटक

Asha workers were cheated of 24 lakhs by promising jobs in the health department | आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवून आशा कार्यकर्तीस २४ लाखाला फसविले

आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवून आशा कार्यकर्तीस २४ लाखाला फसविले

देवणी (जि. लातूर) : आरोग्य विभागात नोकरी लावतो म्हणून एका आशा कार्यकर्तीस २४ लाख ३० हजार रुपयांना फसविल्याची घटना तालुक्यातील होनाळी येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुध्द देवणी पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकास पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, देवणी तालुक्यातील होनाळी येथील फिर्यादी सुरेखा उमाकांत चौधरी ह्या आशा कार्यकर्ती म्हणून गावात काम करीत आहेत. दरम्यान, सुधीर शंकर कारभारी (रा. होनाळी), श्रीकांत दासराव शिंदे (रा. लातूर) व राजरतन रामराव सूर्यवंशी (रा. हासेगाव) यांनी संगनमत केले. या तिघांनी २५ मार्च २०२१ ते १४ जून २०२४ या कालावधीत फिर्यादी चौधरी व अन्य तिघांना आरोग्य उपविभागात नोकरी लावतो असे सांगून नोकरीचे आमिष दाखविले. आरोग्य विभागाचे बनावट कागदपत्र तयार करुन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा बनावट शिक्का व स्वाक्षरी केली. ही बनावट कागदपत्रे फिर्यादीस व इतरांना देऊन प्रत्येकांकडून रोख, धनादेश व ऑनलाईनरित्या २४ लाख ३० हजार २२५ रुपये घेऊन फसवणूक केली.

याप्रकरणी सुरेखा चौधरी यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलिस ठाण्यात बुधवारी वरील तिघांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी सुधीर कारभारी यास अटक करुन येथील न्यायालयासमोर हजर केले असता २२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित दोन आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलिस निरीक्षक माणिकराव डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नारायणराव डप्पडवाड हे करीत आहेत.

Web Title: Asha workers were cheated of 24 lakhs by promising jobs in the health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.