आशिव आरोग्य उपकेंद्राला नागरिकांनी ठोकले टाळे
By संदीप शिंदे | Published: February 5, 2024 04:44 PM2024-02-05T16:44:28+5:302024-02-05T16:46:06+5:30
सध्या आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
बेलकुंड : औसा तालुक्यातील आशिव येथील आरोग्य उपकेंद्र सतत बंद राहत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे सांगत नागरिकांनी सोमवारी उपकेंद्राला टाळे ठोकले.
आशिव गावची लोकसंख्या ९ हजारांवर असून, उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत हे उपकेंद्र चालविले जाते. उपकेंद्रावर प्रत्येकी एक सामाजिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका व आरोग्य सेवकाची नेमणूक असून या उपकेंद्रामार्फत आशिव, आशिव तांडा व वांगजी या गावांना आरोग्य सेवा दिली जाते. मात्र, उपकेंद्रातील आरोग्य अधिकाऱ्याने राजीनामा दिला असून, आरोग्य सेविका सहा महिन्यांच्या विभागीय प्रशिक्षणासाठी गेल्या आहेत. त्यामुळे उपकेंद्र सतत बंद असते.
आज लसीकरणाची तारीख असल्याने गावातील गराेदर महिला उपकेंद्राकडे आल्या असता त्यांना केंद्र बंद दिसले. तसेच गावातील नागरिकांनी चौकशी केली असता आरोग्यसेवक कार्यालयीन बैठकीसाठी औसा येथे गेले असल्याचे कळल्यावर संतप्त गावकऱ्यांनी उपकेंद्राला टाळे ठोकले. यावेळी नामदेव माने, गोविंद मदने, माधव देवकर, काका लोखंडे, विठ्ठल कांबळे, रोहीत लोळगे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.
आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता...
सध्या आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मनुष्यबळ उपलब्ध होताच आशिवला प्राथमिकता दिली जाईल, तिथे तत्काळ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.एच.व्ही. वडगावे यांनी सांगितले.