लातूरमधील हत्या कोचिंग क्लासेसमधील स्पर्धेतूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:34 AM2018-06-27T06:34:44+5:302018-06-27T06:35:04+5:30
शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमुळे येथील कोचिंग क्लासेसची उलाढाल कोट्यवधी रुपयांवर गेली आहे. त्यातून निर्माण झालेल्या व्यावसायिक स्पर्धेतून कोचिंग क्लास संचालकाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे
लातूर : शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमुळे येथील कोचिंग क्लासेसची उलाढाल कोट्यवधी रुपयांवर गेली आहे. त्यातून निर्माण झालेल्या व्यावसायिक स्पर्धेतून कोचिंग क्लास संचालकाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री एका प्राध्यापकासह पाच जणांना अटक केली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून हत्येसाठी २० लाखांत सुपारी दिल्याचे समोर आले आहे़
‘स्टेप बाय स्टेप’ कोचिंग क्लासचे संचालक अविनाश बाबुराव चव्हाण यांची रविवारी रात्री गोळ्या झाडून हत्या झाली. पोलिसांनी हत्येप्रकरणी कुमार मॅथ्स क्लासचे संचालक प्रा़ चंदनकुमार शर्मा याच्यासह अक्षय भिवा शेंडगे, करण चंद्रपाल सिंग गहीरवार, शरद सूर्यकांत घुमे, महेशचंद्र प्रभाकरराव घोडके यांना सोमवारी मध्यरात्री लातुरातून अटक केली़
त्यांच्याकडून पिस्तूल, १३ जिवंत काडतुसे आणि रोख २ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे़, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ शिवाजी राठोड यांनी दिली़
हत्येनंतर देवदर्शन
रविवारी रात्री पावणेबारा
वाजता अक्षय शेंडगे व करण गहिरवार यांनी चव्हाण यांच्यावर गोळ्या झाडल्या.त्यानंतर, ते भाड्याच्या वाहनाने देवदर्शनासाठी रवाना झाले.
पहिला प्रयत्न फसला
चव्हाण यांच्या हत्येची तयारी दोन आठवड्यांपासून मारेकऱ्यांकडून सुरू होती़ १० जून रोजी टेहळणी करण्यात आली़ मात्र, १३ जून रोजी पावसामुळे हत्येचा प्रयत्न फसला होता.
मूळचा बिहारचा असलेला प्रा़ चंदनकुमार शर्मा व अविनाश चव्हाण यांनी एके काळी भागीदारीत कोचिंग क्लास सुरू केला होता़ अविनाश चव्हाण यांनी २०१५ मध्ये ‘स्टेप बाय स्टेप’ स्वतंत्र कोचिंग क्लास सुरू केला. व्यावसायिक स्पर्धेतून एकमेकांत वैर निर्माण झाले होते. त्यातून २० लाखांची सुपारी देऊन चव्हाण यांची हत्या घडवून आणली, अशी कबुली शर्मा याने दिली़ मारेकºयांना १० लाख रुपये देण्यात आले होते.
३६ तासांत गुन्ह्याचा छडा
अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा शिवारात मारेकºयांनी रंगीत तालीम केली होती़
गुन्ह्याचा छडा ३६ तासांत लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.