तलाठी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात 'लाडकी बहीण'च्या कागदपत्रांसाठी गर्दीच गर्दी
By हरी मोकाशे | Published: July 3, 2024 07:29 PM2024-07-03T19:29:25+5:302024-07-03T19:29:48+5:30
'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभासाठी धावपळ
लातूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे काढण्याकरिता सोमवारी पहिल्याच दिवशी नागरिकांनी तलाठी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र, तहसील कार्यालयात गर्दीच गर्दी केली होती. त्यामुळे या केंद्रांना यात्रेचे स्वरुप आल्याचे पहावयास मिळाले.
महिलांचे आरोग्य, पोषण व आर्थिक स्वावलंबनासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर मासिक दीड हजार रुपये जमा हाेणार आहेत. लाभासाठी आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र अथवा जन्म दाखला, वार्षिक अडीच लाखापर्यंतचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक खात्याच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो, रेशन कार्ड ही कागदपत्रे बंधनकारक आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी केवळ १५ दिवसांची मुदत असल्याने पहिल्या दिवसापासूनच नागरिकांची धावपळ सुरु होती.
रहिवासी, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी कसरत...
लाभासाठी तहसील कार्यालयाचे उत्पन्नाचे आणि रहिवासी प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. या प्रमाणपत्रांसाठी किमान एक ते चार दिवस लागतात. त्यामुळे ती लवकरात लवकर मिळावी म्हणून आवश्यक कागदपत्रे काढण्याकरिता आणि ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्यासाठी नागरिकांची तलाठी कार्यालय, महा- ई- सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रावर गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.
अर्जाचा नमुना नसल्याने अडचण...
योजनेच्या अर्जाचा नमुना सोमवारी सायंकाळपर्यंत उपलब्ध झाला नव्हता. परिणामी, कोणकोणती व कशी माहिती भरावी लागेल, याबाबत अधिकारी व कर्मचारी अनभिज्ञ होते. दरम्यान, सेतू सुविधा केंद्र चालक अजून ऑनलाईन अर्ज उपलब्ध झाला नसल्याचे सांगत होते.
साहेब, अंगणवाडी सेविका अर्ज घेत नाही...
जिल्हा परिषदेतील सीईओंच्या कक्षाकडे सोमवारी दुपारी एक अंध व्यक्ती आला. साहेब, माझी लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी सेविका आमचा अर्ज अन् कागदपत्रे घेत नाहीत. मुदत तर पंधरा दिवसांचीच आहे. मग कसे करायचे असा केविलवाण्या अवस्थेत प्रश्न केला. तेव्हा तेथील अधिकारी, कर्मचाऱ्याने अजून अर्जाचा नमुना उपलब्ध नाही. त्यामुळे त्या तुमची कागदपत्रे घेतल्या नसतील. काळजी करु नका, सर्वांचे अर्ज घेण्याच्या सूचना आहेत, असे समाधानकारक उत्तर देऊन परत पाठविले.
दाखले कधी पाहिजे?
सोमवारी सकाळपासून नागरिक सेतू सुविधा केंद्राची धडक घेऊन तहसीलमधून मिळणाऱ्या प्रमाणपत्रांबाबत चौकशी करीत होते. तेव्हा केंद्र चालक एका दिवसात हवे की चार दिवसांत अशी विचारणा करुन त्यासाठी किती खर्च येतो, हे सांगत असल्याचे ऐकावयास मिळाले.