मार्चअखेरच्या रात्री जिल्हा परिषदेत ‘जागरण- गोंधळ’; दिवसभरात कोषागारकडे २७ बिले सादर
By हरी मोकाशे | Published: April 1, 2024 05:22 PM2024-04-01T17:22:02+5:302024-04-01T17:24:06+5:30
मार्च महिना आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर करण्याचा महिना होय. त्यामुळे दरवर्षी प्रत्येक शासकीय कार्यालयात मार्चअखेरची धावपळ सुरू असते.
लातूर : मार्चअखेरमुळे पूर्ण झालेल्या कामांची बिले लवकरात लवकर मंजूर करुन ती काढण्यासाठी गुत्तेदारांची तर देयके विनाविलंब दिली जावीत म्हणून कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदीसाठी जिल्हा परिषदेत घाई होती. त्यामुळे रविवारी रात्री अधिकारी- कर्मचाऱ्यांचे जागरण सुरु होते, तर आपली बिले लवकर मंजूर करावीत म्हणून काही कंत्राटदारांचा गोंधळ सुरु होता. दरम्यान, जिल्हा परिषदेकडून एकाच दिवसात कोषागार कार्यालयाकडे २७ बिले सादर करण्यात आली आहेत.
मार्च महिना आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर करण्याचा महिना होय. त्यामुळे दरवर्षी प्रत्येक शासकीय कार्यालयात मार्चअखेरची धावपळ सुरू असते. शासनाकडून उपलब्ध निधीचा तात्काळ वापर व्हावा जोरदार प्रयत्न सुरू असतात. शिवाय, शासनाकडून विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. जिल्हा परिषदेंतर्गतच्या विविध योजना, विकास कामांसाठी प्राप्त निधीचा मुदतीत निपटारा व्हावा म्हणून सीईओंनी २९ मार्चची सार्वजनिक सुटी तर ३० आणि ३१ मार्च रोजीची साप्ताहिक सुटी रद्द करुन या तिन्ही दिवशी जिल्हा परिषद सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते.
बिलाच्या मंजुरीसाठी ऑनलाईन नोंदीची अट...
मार्चअखेरमुळे पूर्ण करण्यात आलेल्या कामांची बिले काढण्यासाठी सर्वांची घाई असते. त्यामुळे यंत्रणेवर ताण येतो. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून शासनाने रविवारी सायंकाळी ६ वा.पर्यंत झेडपीएफएमएस पोर्टलवर ऑनलाईन बिल अपलोड करावे आणि त्यानंतर ते बिल संबंधिताच्या खात्यावर जमा होईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, संकेतस्थळ वारंवार हँग होत असल्याने मोठी अडचण झाली होती.
बांधकाम विभागात ९३ बिले सादर...
रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे एकूण ९३ बिले सादर करण्यात आली. त्यापैकी केवळ २३ बिले ऑनलाईन झाली आहेत. उर्वरित ७० बिले ऑफलाईनरित्या स्विकारण्यात आली आहेत. शासनाचे आदेश आल्यानंतर ती ऑनलाईनरित्या अपलोड करुन मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
ऑफलाईन नोंदीसाठी टोकन...
बिल मंजुरीचे प्रस्ताव पाहून बांधकाम विभागाने टोकन पध्दतीने क्रमांक दिले होते. त्यानुसार बिल घेऊन त्याची छाननी केली जात होती. दरम्यान, काहींनी आपले बिल अगोदर घ्यावे म्हणून गोंधळही घातला. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जागरण वाढले.
एकाच दिवसात १४ कोटीची बिले...
शिक्षण, बांधकाम, पंचायत, समाजकल्याण, कृषी व पशूसंवर्धन विभागाची रविवारी एकाच दिवशी १४ कोटी ५५ लाख ४८ हजारांची २७ बिले कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहेत.
- आप्पासाहेब चाटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी.