राज्यात एकाचवेळी आठ आरोग्य केंद्रांना सर्वोच्च मानांकनाचा बहुमान लातूरला

By हरी मोकाशे | Published: January 6, 2024 10:05 PM2024-01-06T22:05:55+5:302024-01-06T22:06:38+5:30

एनकॉसकडून मूल्यांकन : तीन वर्षांत ७२ लाख रुपये मिळणार

At the same time eight health centers in the state got the honor of highest ranking in Latur | राज्यात एकाचवेळी आठ आरोग्य केंद्रांना सर्वोच्च मानांकनाचा बहुमान लातूरला

राज्यात एकाचवेळी आठ आरोग्य केंद्रांना सर्वोच्च मानांकनाचा बहुमान लातूरला

लातूर : राष्ट्रीय स्तरावर आणि शासनाच्या आरोग्य विभागात सर्वोच्च गणल्या जाणाऱ्या नॅशनल हेल्थ सिस्टिम रिसोर्स सेंटर (एनकॉस) चे जिल्ह्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांना शनिवारी मानांकन मिळाले आहे. पारितोषिकापोटी तीन वर्षांत या आरोग्य केंद्रांना एकूण ७२ लाख मिळणार आहेत. विशेष म्हणजे, राज्यात एकाच वेळी आठ केंद्रांना मानांकन मिळविण्याचा लातूरने पहिलाच बहुमान प्राप्त केला आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गुणवत्तापूर्ण सेवा - सुविधा देत राज्याबराेबर देशस्तरावर आपला ठसा उमटविला आहे. दरम्यान, केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गतच्या एनकॉसमार्फत नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील जवळा बु., वांजरवाडा, हडोळती, शिरूर ताजबंद, जवळगा पो., लामजना, कासार बालकुंदा, हंडरगुळी प्राथमिक आरोग्य केंद्रांची विविध राज्यांतील १० तज्ज्ञांच्या पथकाकडून मूल्यांकन झाले होते.

एक हजारपेक्षा अधिक मुद्यांची तपासणी...
या पथकाने प्रत्येक केंद्रात एक हजारपेक्षा अधिक मुद्यांचे रेकॉर्ड तपासले. शिवाय, कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाच्या चाचण्या घेतल्या. बाह्यरुग्ण विभाग, प्रसूतीगृह, प्रयोगशाळा, राष्ट्रीय कार्यक्रम अंमलबजावणी, प्रशासन, आंतररुग्ण विभाग अशा सहा विभागांची सखोल तपासणी केली. त्याचबरोबर आरोग्य केंद्रातून देण्यात येणाऱ्या सेवा, रुग्णांच्या प्रतिक्रियाही घेण्यात आल्या होत्या.

प्रधानमंत्री उत्कृष्ट सेवा पुरस्कारही...
केंद्र शासनाच्या कायाकल्पमध्ये गेल्या वर्षी जिल्ह्यास ३१ लाखांचे बक्षीस मिळाले. राज्यात सर्वाधिक पुरस्कार मिळविणारा लातूर जिल्हा ठरला. त्याचबरोबर गत एप्रिलमध्ये आरोग्यवर्धिनीतील गुणवत्तापूर्ण सेवेसाठी प्रशासनातील प्रधानमंत्री उत्कृष्ट सेवा पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य विभागास गौरविण्यात आले होते.

प्रत्येक केंद्रास वर्षाला तीन लाख...
जिल्हा आरोग्य विभागातील जवळपास ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यावर मात करीत हे मानांकन मिळविले आहे. त्यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्रांना वार्षिक तीन लाख अशी तीन वर्षे रक्कम मिळणार आहे. एकूण या केंद्रांना ७२ लाख मिळणार आहेत. त्यातून आरोग्य सेवा सुधारण्यास मदत होणार आहे.

आरोग्य विभागाचे उत्कृष्ट कार्य...
हा बहुमान जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून नववर्षाची भेट आहे. आरोग्य विभागाने उत्कृष्ट कार्य केले आहे. या आरोग्य केंद्रांच्या धर्तीवर इतर केंद्र निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अधिकाधिक चांगल्या आरोग्य सेवा देणे हे आमचे नवीन वर्षातील ध्येय आहे.
- वर्षा ठाकूर - घुगे, जिल्हाधिकारी.

मानांकनामुळे प्रोत्साहन...
आठ आरोग्य केंद्रांना एनकॉसचे मानांकन मिळाल्याने सेवा-सुविधा अधिक बळकट होतील. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच मनोबल वाढण्यास मदत होणार आहे.
- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: At the same time eight health centers in the state got the honor of highest ranking in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर