शिक्षकाला पावणेतीन लाखांचा ऑनलाइन गंडा; धनेगाव तांडा येथील घटना
By राजकुमार जोंधळे | Published: October 16, 2022 07:59 PM2022-10-16T19:59:03+5:302022-10-16T19:59:28+5:30
लातूर जिल्ह्यातील वरांडी येथे शिक्षकाची पावणेतीन लाखांची ऑनलाइन फसवणुक करण्यात आली.
वलांडी (लातूर) : देवणी तालुक्यातील धनेगाव तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला फोनवरून बँक कर्मचारी बोलत आहे, अशी बतावणी करून आपले क्रेेडिट कार्ड सुरू करतो, असे म्हणून ओटीपी विचारून बँक खात्यातून तब्बल २ लाख ७१ हजार ४४८ रुपये परस्पर काढून घेत ऑनलाइन गंडा घातला आहे. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, धनेगाव तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले बाबू चंदू जाधव (५६, रा. धनेगाव तांडा, ता. देवणी) यांना अज्ञात व्यक्तीने साेमवार, दि.१० ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वेगवेगळ्या दोन मोबाइल क्रमांकांवरून फाेन केला. ताे इसम हिंदीतून बाेलत हाेता. दरम्यान, मी स्टेट बँकेतील अधिकारी बोलत आहे. आपले क्रेडिट कार्ड सुरू करायचे आहे. ते सुरू नाही केले, तर बंद पडणार आहे, अशी बतावणी करून, बँक खाते क्रमांक, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड आणि फोन पे ओटीपीची माहिती घेतली. त्यानंतर शिक्षकाच्या बँक खात्यातून परस्पर २ लाख ७१ हजार ४४८ रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेत ऑनलाइन गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर फिर्यादी शिक्षकाला घामच फुटला.
याबाबत देवणी पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गु.र.नं. २३६/२०२२ कलम ४२० भा.दं.वि. ६६ (सी) (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार संबंधित मोबाइल क्रमांकच्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे करत आहेत.