खेळाडू शालेय क्रीडा स्पर्धेच्या प्रतीक्षेत; परीक्षा, सणांमुळे आता दिवाळीनंतरच उडणार स्पर्धेचा बार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 06:58 PM2022-10-07T18:58:39+5:302022-10-07T19:00:09+5:30
प्रथमसत्र परीक्षा व दिवाळीमुळे या स्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे खेळाडू प्रतीक्षेत आहेत.
- महेश पाळणे
लातूर : दोन वर्षे कोरोनाचा मार. त्यानंतर एसजीएफआय मधील वाद. यातच शालेय स्पर्धेचा खेळ झाला होता. कसेबसे शासनाने राज्यस्तरापर्यंतच्या स्पर्धेला परवानगी दिली असली तरी परीक्षा व दिवाळी सणांमुळे या स्पर्धा लांबणीवर गेल्या आहेत. त्यामुळे दिवाळी नंतरच शालेय स्पर्धेचा बार उडणार आहे.
१६ सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या उपसचिवांनी क्रीडा आयुक्तांना शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजन बाबत सुचविले होते. २०२२-२३ या वर्षात राज्यस्तर पर्यंतच्या स्पर्धा आयोजनाची मान्यता प्रदान करण्यात आली होती. यात तालुका ते राज्यस्तर पर्यंतच्या स्पर्धांचा समावेश आहे. त्यानंतर क्रीडा आयुक्तांनी ९१ खेळांच्या स्पर्धा घेण्याचे विभागीय उपसंचालक व जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना सुचविले होते. यात अनुदानित व विनाअनुदानित खेळांचा समावेश आहे. मात्र प्रथमसत्र परीक्षा व दिवाळीमुळे या स्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे खेळाडू प्रतीक्षेत आहेत.
स्पर्धेची अनेक कामे प्रलंबित...
स्पर्धेपूर्वी स्थळ, तारीख व वेळापत्रक बनविणे आवश्यक असते. यासह ग्रामीण व मनपा स्पर्धेसाठी नियम व अन्य बाबींच्या पुस्तिका छापणे ही गरजेचे असते. यासह क्रीडा शिक्षकांची बैठकही आयोजित केली जाते.
विद्यापीठाच्या स्पर्धा सुरू...
नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विभागीय व आंतरविभागीय स्पर्धेचा कार्यक्रम गत महिन्यातच ठरला असून, त्यांच्या स्पर्धेला ही सुरुवात झाली आहे. मात्र शालेय स्पर्धेचा कार्यक्रम अजून घोषित नसल्याने शालेय खेळाडू वेटिंगवर आहेत.
क्रीडा शिक्षक संघटनेची मागणी...
दोन वर्षानंतर होणाऱ्या शालेय स्पर्धेला खो बसला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाने स्पर्धेसाठी क्रीडा मंत्र्यांना साकडे घातले होते. त्यानंतर या स्पर्धेला मान्यता मिळाली. मात्र परीक्षा व दिवाळी जवळ आल्याने महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी या स्पर्धा दिवाळीनंतर घेण्याचे सुचविले होते.
९१ खेळांच्या स्पर्धा...
९३ खेळांच्या खेळ प्रकारांची यादी संबंधित प्रशासनाला आयोजनासाठी पाठविली असली तरी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल व नेहरू कप हॉकी या दोन स्पर्धा झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ९१ खेळांच्या स्पर्धा होतील. राज्य स्पर्धा डिसेंबरमध्ये असल्याने महिनाभरात तालुका ते विभागाच्या स्पर्धा घेण्याचे आव्हान क्रीडा विभागासमोर उभे आहे.
स्पर्धेचे नियोजन सुरू...
दिवाळीनंतर २७ किंवा २८ तारखेपासून तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेला सुरुवात करण्यात येणार आहे. १९ ऑक्टोबरला क्रीडा शिक्षकांची बैठक घेऊन स्पर्धेचा कार्यक्रम निश्चित केला जाईल.
- जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडाधिकारी