शेजारच्या ६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; १० महिन्यांत आराेपीला जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 06:05 PM2022-02-05T18:05:51+5:302022-02-05T18:07:10+5:30
सहा वर्षाची मुलगी ही आजीसाेबत घरी असताना केला अत्याचार
लातूर : घरासमाेर अंगणात खेळणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर शेजारीच राहणाऱ्या एका २५ वर्षीय आराेपीने अत्याचार केल्याची घटना दहा महिन्यांपूर्वी अहमदपूर तालुक्यातील एका गावामध्ये घडली हाेती. दरम्यान, याप्रकरणी अहमदपूर न्यायालयात खटला चालविण्यात आला. आराेपीला जन्मठेप आणि २५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा अहमदपूर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश संभाजी ठाकरे यांनी सुनावली आहे.
विशेष सहायक सहकारी वकील महेश पाटील यांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील एका गावामध्ये एक दाम्पत्य आपल्या सहा वर्ष आणि दाेन वर्षाच्या मुलीस घरी साेडून उसताेडीच्या कामासाठी साेलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे गेले हाेते. दरम्यान, त्यांची सहा वर्षाची मुलगी ही आजीसाेबत गावाकडेच वास्तव्याला हाेतीृ ७ मार्च २०२१ राेजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घरासमाेरच्या अंगणातच खेळत हाेती. यावेळी घरामागेच राहणारा आराेपी अतुल बाबुराव कवडे (२५) याने तिला दहा रुपयांचे आमिष दाखवून अत्याचार केले. घडलेल्या घटनेबाबत काेणाला काही सांगितले तर ठार मारीन अशी धमकी दिली. घटनेच्या दाेन दिवसानंतर मुलीच्या अंगावरील जखमा पाहून आजीने अधिक विश्वासात घेत चाैकशी केली असता, घटल्या प्रकाराचे बिंग फुटले. तातडीने आजीने नातीला साेबत घेवून अहमदपूर पाेलीस ठाणे गाठले. याप्रकरणी अहमदपूर पाेलीस ठाण्यात आराेपी अतुल कवडे याच्याविराेधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पाेलिसांनी तपास करुन अहमदपूर न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. न्यायालयात एकूण दहा साक्षीदारांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. शिवाय, पीडित मुलीची आजी आणि तपासिक अधिकारी यांच्याही साक्ष महत्वपूर्ण ठरल्या आहेत. याप्रकरणी आराेपी अतुल कवडे याला अजन्म कारावास आणि २५ हजारांचा दंड अशी शिक्षा न्यायाधीश संभाजी द. ठाकरे यांनी सुनावली. हा खटला विशेष सरकारी वकील महेश पाटील यांनी चालविला. त्यांना माेहम्मद अब्बास माेहम्मद हैदर यांनी सहाकर्य केले.