लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ औराद कडकडीत बंद; कर्नाटक, तेलंगणात जाणारी बससेवा बंद
By संदीप शिंदे | Published: September 4, 2023 04:05 PM2023-09-04T16:05:32+5:302023-09-04T16:07:37+5:30
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या तिन्ही राज्यात औराद शहाजानी येथून जाणाऱ्या बसेसच्या १२२ फेऱ्या बंद
औराद शहाजानी : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी औराद शहाजानी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यात शहरातील विविध २२ व्यापारी संघटना ,आडत बाजार यांच्यासह सर्व शैक्षणिक संस्थांनी सहभाग नोंदविला.
दरम्यान महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या तिन्ही राज्यात औराद शहाजानी येथून जाणाऱ्या बसेसच्या १२२ फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा समाजाच्या आंदाेलकावर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा निषेध म्हणून साेमवारी औराद शहाजानीत बंद पुकारण्यात आला. यात शहरातील आडत बाजार, सराफ बाजारपेठ, जनरल स्टोअर्स, कपडा, किराणा आदी २२ व्यापारी संघटनांसह शैक्षणिक संस्थांनी बंदला पाठिंबा दिला.
सोमवारी सकाळी शहरातून सकल मराठा समाजाच्या वतीने माेटार सायकल रॅली काढण्यात आली. मुख्य रस्ता, बसस्थानक, बालाजी मंदिर, भवानी मंदिर, गांधी चाैक, विवेकानंद चाैक, आडत मार्केटमार्गे लातूर-जहिराबाद महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅली पोहोचली. यानंतर सर्व आंदाेलकांनी एकत्र येत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत लाठीहल्ल्याचा निषेध नोंदविला. यावेळी पद्मसिंह पाटील, छावाचे भगवान माकणे, कन्हैया पाटील, लखन बाेडंगे, शिवाजी शेटकार, दिंगबर अंतरेड्डी, अर्जुन मेहकरे, माधव गाडे, अंकुश भंडारे, विलास कांबळे, कृष्णा गाडे, राहुल पाटील, शाम पाटील, अभिषेक बिरादार, मनाेज भंडारे, भरत दापके, अमाेल पाटील, रविंद्र भंडारे, राेहीत शिंदे, सुरज भंडारे, आदेश भंडारे, प्रदीप उगिले, संभाजी गाडे, वैभव बेलुरे, संताेष बाेडंगे, सिध्दु शिवणे, आशिष थेटे, आदित्य पवार, ज्ञानेश्वर बोंडगे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती. तिन्ही राज्यात ये-जा करणारी बससेवा औराद शहाजानी बंदच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आल्याचे निलंगा आगार प्रमुख गणेश बिडवे यांनी सांगितले. तसेच बंदच्या पार्श्वभुमीवर औराद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चाकूर, अहमदपूर, नळेगाव, हाळी येथे कडकडीत बंद...
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ अहमदपूर, चाकूर, नळेगाव, हाळी हंडरगुळी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच जळकाेट येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.