महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील औरादला ४४.५ उच्चांकी तापमानाची नोंद
By संदीप शिंदे | Published: May 5, 2024 08:10 PM2024-05-05T20:10:44+5:302024-05-05T20:11:07+5:30
पूर्वेकडून आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक सीमा भागातून उष्णतेच्या लाट येत असल्यामुळे या भागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.
औराद शहाजानी (जि. लातूर) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील औराद शहाजनी परिसरात चौथ्या दिवशीही उष्णतेची लाट असून, रविवारी वर्षभरातील उच्चांकी ४४.५ तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर रविवारी ४४.५ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २६ अंशाची नोंद झाली आहे. वाढीव तापमानामुळे परिसरामध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून अंगाची लाही-लाही होताना दिसत आहे. पूर्वेकडून आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक सीमा भागातून उष्णतेच्या लाट येत असल्यामुळे या भागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.
यापूर्वीच हवामान केंद्राने ५ मे हा या वर्षातील सर्वाधिक उच्चांकी तापमान राहण्याचा अंदाज वर्तविलेला होता. पुढील काळामध्ये काही दिवस तापमान ४० अंशाच्या पुढे राहणार असले तरी या आठवड्यात शेवटच्या दिवसांमध्ये तापमान कमी होण्यास सुरुवात होऊन ९ ते १० तारखेनंतर या भागामध्ये अवकाळी पावसाचे वातावरण तयार होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.