वाहनचाेरी करणारा चाेवीस तासांत जाळ्यात, तीन वाहनांसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: June 16, 2023 08:40 PM2023-06-16T20:40:46+5:302023-06-16T20:40:54+5:30
लातूर पाेलिसांची कारवाई.
राजकुमार जाेंधळे / लातूर : चार चाकी वाहनाची चाेरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला लातुरातील गांधी चाैक पाेलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अवघ्या चाेवीस तासांत ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तीन, चार चाकी वाहनासह २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, ही कारवाई शुक्रवारी केली.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील सम्राट चाैकातून पाच लाखांचे पिकअप वाहन (एमएच ४४ यू ००७०) आणि त्यात असलेली दाेन लाखांची पेंडखजूर पिकअपसह मध्यरात्री चाेरीला गेले हाेते. दरम्यान, याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पाेलिस पथकाने आराेपींचा शाेध सुरू केला असता, वासनगाव (ता. लातूर) शिवारात असलेल्या एका हाॅटेललगत या गुन्ह्यातील चाेरीला गेलेले वाहन आणि १७ वर्षीय मुलगा असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तातडीने हाॅटेललगत धावत त्या मुलाला ताब्यात घेतले.
त्याची अधिक चाैकशी केली असता, त्याने शिवाजीनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून चाेरी केलेली जीप आणि तुळजापूर (जि. धाराशिव) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून चाेरी केलेली टाटा सुमाे, असे दाेन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्या गुन्ह्यात चाेरी केलेली वाहने ठेवलेले ठिकाण त्याने पाेलिसांना दाखविले. त्यानंतर त्यांच्याकडून पाेलिसांनी वीस लाखांची एकूण तीन चारचाकी वाहने जप्त केली आहेत. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चाैक ठाण्याचे पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पाेलिस उपनिरीक्षक अक्रम माेमीन, पाेलिस हेड काॅन्स्टेबल दामाेदर मुळे, हेड काॅन्स्टेबल राजेंद्र टेंकाळे, पाेलिस हेड काॅन्स्टेबल दत्तात्रय शिंदे, पाेलिस हेड काॅन्स्टेबल रणवीर देशमुख, पाेलिस नाईक शिवाजी पाटील यांच्या पथकाने केली आहे.