दैठण्यात काॅनबॅकच्या धर्तीवर बांबूलागवड माहिती केंद्र उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:19 AM2021-04-24T04:19:37+5:302021-04-24T04:19:37+5:30
शिरूर अनंतपाळ : वसुंधरेचा धोका टाळून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्यासाठी बांबूलागवड काळाची गरज बनली आहे. त्यामुळे तालुक्यातील दैठणा ...
शिरूर अनंतपाळ : वसुंधरेचा धोका टाळून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्यासाठी बांबूलागवड काळाची गरज बनली आहे. त्यामुळे तालुक्यातील दैठणा येथे काॅनबॅकच्या धर्तीवर बांबू लागवड माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचा या भागातील शेतकऱ्यांना भविष्यात मोठा फायदा होणार आहे, असे राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी गुरुवारी सांगितले.
किसान कट्ट्यावरून शेतकऱ्यांना त्यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. पाशा पटेल म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगमुळे वसुंधरेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वसुंधरा टिकली तर त्यावरील सजीवसृष्टी टिकणार आहे. वसुंधरेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबूलागवड केली पाहिजे. बांबूच्या लागवडीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडणार आहे, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. त्यासाठी काॅनबॅक संस्थेच्या धर्तीवर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथे बांबूलागवड माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. दैठणा येथील काही शेतकऱ्यांनी बांबूलागवड सुरू केली आहे.
बांबूलागवडीचा दुहेरी फायदा...
बांबूलागवड शेतकऱ्यांसाठी फलदायी आहेच. बांबू ही शंभर टक्के कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेऊन शंभर टक्के ऑक्सिजन देणारे आहे. मानवाला आज ऑक्सिजनची गरज आहे. तसेच ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी बांबूचा मोठा फायदा होणार आहे. बांबू लागवडीचा खर्च अत्यंत माफक असून, एकदा लागवड केल्यानंतर ती वर्षानुवर्षे टिकते. मात्र उत्पादन सुरूच राहते. हेक्टरी शेतकऱ्यांना अडीच लाखांचे उत्पन्न मिळते. माहिती केंद्राच्या माध्यमातून बांबूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बांबू कारखान्यास कच्चा माल पुरविण्यासाठी बांबूपासून कुट्टा करण्याकरिता ५० लाखांची मशीनसुध्दा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, असेही पाशा पटेल यांनी सांगितले.