स्टेट बँक विलिनीकरणाविरोधात लातुरात बँक कर्मचा-यांचा मोर्चा
By admin | Published: February 28, 2017 02:54 PM2017-02-28T14:54:08+5:302017-02-28T14:56:05+5:30
स्टेट बँकेच्या विलिनीकरणाविरोधात मंगळवारी पुकारण्यात आलेल्या राष्ट्रीय संपाच्या निमित्ताने लातूर मधील बँक कर्मचारी अधिकार्यांनी मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली.
Next
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 28 - स्टेट बँकेच्या विलिनीकरणाविरोधात मंगळवारी पुकारण्यात आलेल्या राष्ट्रीय संपाच्या निमित्ताने लातूर मधील बँक कर्मचारी अधिकार्यांनी मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. या मोर्चात बँक ऑफ महाराष्ट्र, मिनी मार्केट- हनुमान चौक- गुळ मार्केट, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद अशा बँकेच्या कर्मचा-यांनी सहभाग नोंदवला. आंदोलक बँक कर्मचार्यांपुढे बोलताना कॉ. धनंजय कुलकर्णी म्हणाले की, स्टेट बँक विलीनीकरणाचा निर्णय हा आपला कर्मचा-यांचा विरोध डालून सरकार मुजोरपणे घेत आहे.
या पाच बँकांच्या विलिनीकरणानंतर इतर बँकांच्या विलिनीकरणाचा रेटा वाढेल. शेतकर्यांची कर्जे उत्तर प्रदेशात माफ करतो म्हणणारे मोदी महाराष्ट्रातील शेतकर्यांची कर्जे माफ करत नाहीत. नोटाबंदीने काळा पैसा बाहेर काढतो म्हणणारे मोदी नेमके किती पैसा बँकेत परत आला ते सांगण्यास धजावत नाहीत. हा एक मोठा फ्रॉड आहे. या दरम्यान जवळपास एकशे दहा जणांचे बळी गेले. त्यांना अजुन नुकसान भरपाई मिळाली नाही. गोव्यात जावून बँक कर्मचार्यांची स्तुती करणारे पंतप्रधान जादा कामाचे पैसे मात्र देत नाहीत.
नोटाबंदीमुळे एक लाख दहा हजार कोटींचे नुकसान बँकांना सहन करावे लागले. त्याची भरपाईसुद्धा हे सरकार देत नाही. मोठ्या कर्जदारांनी दहा लाख कोटी एवढे बँक कर्ज बुडविले आहे. त्याचा वसुलीसाठी हे सरकार कायदा करीत नाही. कामगार कायदे भांडवलदार धार्जिणे बनवले जात आहेत. त्यामुळे येणार काळातील प्रखर संघर्षास सिद्ध रहा, अशा शब्दांत त्यांनी आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, या संपात आज बँकांनी सहभागी होत जवळपास ८०० कोटींचा व्यवहार ठप्प केला. बँकांच्या सात संघटनांनी संप पुकारल्याने जिल्ह्यातील स्टेट बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या सर्वच शाखा बंद होत्या.
या आंदोलकांना कॉ. प्रशांत धामणगांवकर, व कॉ. उमेश कामशेट्टी यांनी ही संबोधित केले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. उत्तम होळीकर, कॉ. दीपक माने, कॉ. उदय मोरे, कॉ. राजेंद्र दरेकर, कॉ. पवन मोटे, कॉ. किशोर चंदन, कॉ. नारायणकर, कॉ.इबीतवार, कॉ. सरस्वती हेड्डा, कॉ. मेघा मयुरी, कॉ. भावना पटले, कॉ. प्रतिमा जगताप यांनी केले. मोर्चात जवळपास २०० कर्मचारी अधिकारी सामील झाले होते.