दुष्काळाच्या उंबरठ्यावरील शेतकऱ्यांना पीककर्ज वसुलीसाठी बँकेच्या नोटिसा
By हरी मोकाशे | Published: August 28, 2023 08:58 PM2023-08-28T20:58:26+5:302023-08-28T20:58:35+5:30
बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले : व्याज अकारणी तब्बल १४.५ टक्के
लातूर : वरुणराजाने दीर्घ ताण दिल्याने खरिपातील पिके माना टाकत आहेत. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा हतबल होऊन वर्ष कसे काढावे अशा चिंतेत असताना निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेने कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा तरी चांगले उत्पादन मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु, हंगामाच्या सुरुवातीपासून संकटे सुरू झाली. विलंबाने पाऊस झाल्याने जुलैमध्ये खरिपाच्या पेरण्या झाल्या. पिकांपुरता पाऊस झाल्यामुळे पिके बहरली होती. सध्या सोयाबीन फूल, शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, पावसाने जवळपास महिनाभरापासून उघडीप दिली आहे. विशेष म्हणजे, ऑगस्टमध्ये ५० वर्षांतील सर्वांत कमी पाऊस झाला आहे. परिणामी, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेने थकीत पीक कर्जासाठी कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.
शेतकऱ्यांना कायदेशीर नोटिसा...
येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेकडून काही शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले. हे कर्ज परतफेडीचे तारण, हमी व विनंतीवरून देण्यात आले होते. त्यासाठी सुरक्षा तारण, दस्तऐवज शेतकऱ्यांनी दिले आहे. तसेच वेळोवेळी दस्ताऐवजाचे नूतनीकरणही करून देण्यात आले आहे. त्यामुळे कर्जावर द.सा.द.शे. ७ टक्के व थकीत रकमेवर नियमाप्रमाणे व्याजासह वसुली देऊन परतफेड करण्याचे मान्य केले होते, असे म्हणत शेतकऱ्यांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
३० दिवसांत कर्जाचा भरणा करावा...
नोटिसा मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेकडे कर्जाचा भरणा करावा अन्यथा कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे नोटिसीत बजावले आहे. अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत असलेला शेतकरी आता नोटिसीमुळे नव्या संकटात सापडला आहे. विशेषत: सध्या शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजाचा भरणा करणेही शक्य नाही.
अडीच टक्के आकारले दंड व्याज...
थकीत पीक कर्जावर १२ टक्के व्याज तसेच २.५ टक्के दंड व्याज लागू करण्यात आला आहे. एकूण १४.५ टक्के व्याज आकारणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखेत कर्जाची रक्कम व व्याज भरणा न केल्यास कायदेशीर नोटिसांचा खर्चही खातेदारांच्या नावे टाकण्यात येत असल्याचे नोटिसीत स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांपुढे नवे संकट...
औरादसह परिसरातील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आम्हा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी दत्ता ढाेरसिंगे यांनी केली.
कर्जदारांनी नियमित भरणा करावा...
अनेक शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत आहे. त्यामुळे व्याज वाढले आहे. कर्जदारांनी नियमित कर्जाचा भरणा करावा अथवा बँकेच्या ओटीएस योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे शाखा व्यवस्थापक रवी नाईक यांनी केले.