बनसावरगाव शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात इडली-वडा !
By राजकुमार जोंधळे | Published: August 20, 2023 06:30 PM2023-08-20T18:30:42+5:302023-08-20T18:30:50+5:30
जिल्हा परिषद शाळेत नव्या मेनूचा भरपेट आस्वाद
चाकूर (जि. लातूर) : तालुक्यातील बनसावरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आता मध्यान्ह भोजन आहारात आता खिचडीबराेबरच इडली-वडा आणि सांबर दिले जात आहे. या नव्या मेनूचा विद्यार्थी भरपेट आस्वाद घेत आहेत.
मध्यान्ह भाेजन आहारातील ताेचताेपणा आता बदलण्यात येथील शिक्षकाने पुढाकार घेतला आहे. शाळेतील एका शिक्षकाने स्वखर्चातून या विद्यार्थ्यांना इडली-वडा, सांबर आणि चटणी दिली जात आहे. विद्यार्थ्यांनाही हा नवा मेनू आवडला आहे. परिणामी, शाळेत दिलेल्या या आगळ्या-वेगळ्या मध्यान्ह भोजनाची चर्चा मात्र गावभर आहे. यातून विद्यार्थ्यांचा हजेरीपट वाढला आहे.
चाकूर तालुक्यातील बनसावरगाव येथे जिल्हा परिषद शाळेत पहिला ते चाैथीपर्यंतची चार शिक्षिकी शाळा आहे. येथे ६३ विद्यार्थी संख्या असून, शिक्षक जनार्धन घंटेवाड हे उन्हाळ्यात रुजू झाले आहे. शाळेत वारानुसार मध्यान्ह भोजनात वरणभात, हरभरा उसळ, खिचडी दिली जाते. विद्यार्थ्यांना नवा मेनू देण्याचा बेत शिक्षक घंटेवाड यांनी केला हाेता. मुलांना शुक्रवारी इडली-वडा, सांबर देण्याचा संकल्प केला हाेता. स्वखर्चाने त्यासाठी लागणारी उडीद डाळ, तूरडाळ, मसाले, भाजीपाला विकत आणला. स्वयंपाकी महिलेकडून इडली-वडा, सांबर, चटणी बनवून घेतली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात हा नवीन मेनू दिला. सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा भरपेट आस्वाद घेतला. शाळेतील या मध्यान्ह भोजनात दिलेल्या आहाराची गावभर चर्चा झाली.
उन्हाळ्याच्या सुटीत भरवला अभ्यास वर्ग...
शाळेत न येणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी शाळेची वाट धरली. शिक्षक जनार्धन घंटेवाड यांनी उन्हाळ्यात शाळेच्या सुटीत अभ्यासिका वर्ग सुरू केले. सर्व विद्यार्थ्यांना सुलेखनाचा सराव व्हावा म्हणून ‘थ्री इन-वन’ योजना सुरू केली. रजिस्टर, पेन्सिल, खोडरबर, शॉपनर आणि बालमित्र उजळणीचे पुस्तकही स्वखर्चातून दिले. पावसाळ्यात शाळा गळत असल्याने घंटेवाड यांनी बारा हजारांची ताडपत्री आणून नायलॉन दोरीने शाळेच्या इमारतीवर टाकली. शिवाय, विद्यार्थ्यांना गरमी होऊ नये म्हणून ५ हजार रुपयांचे दोन सिलिंग फॅनही घंटेवाड यांनी शाळेत बसविले.
नवनवीन उपक्रमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढली...
शाळेत नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात मनस्वी आनंद होतो. दररोजच्या मध्यान्ह भोजन आहारात आठवड्यातून दर शनिवारी बदल केला आहे. कधी शिरा, जिलेबी तर आता इडली-वडा, सांबर, चटणी दिली. यापुढे आम्ही शिक्षक मिळून स्व-खर्चातून दर शनिवारी वेगळा आहार देण्याचा संकल्प केला आहे. -जनार्धन घंटेवाड, शिक्षक, बनसावरगाव