बापूसाहेब काळदाते विरुद्घ केशवराव सोनवणे; तत्वनिष्ठेवर लढली गेलेली लक्षवेधी निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 07:00 PM2019-04-06T19:00:32+5:302019-04-06T19:02:39+5:30
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जिवनधर शहरकर गुरुजी यांच्याशी संवाद
- राजकुमार जोंधळे
लातूर : स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा जवळपास ८० वर्षांचा काळ मी पाहिला. आजपर्यंतच्या लोकसभा निवडणूका प्रत्यक्ष अनुभवल्या, पाहिल्या. मात्र, १९६७ साली झालेली बापूसाहेब काळदाते यांच्याविरुद्घ केशवराव सोनवणे अशी थेट लढत लक्षवेधी ठरली. ती निवडणूक माझ्या स्मरणात आजही कायम आहे.
तत्वनिष्ठेवर अवलंबून असणाऱ्या दोन्ही उमेदवारांमुळे ही लढत रंगतदार ठरली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या निवडणूकीचा प्रचार करताना आनंद मिळाला. त्यावेळची ही निवडणूक विचारांची, सुसंस्कृतपणाची आणि जनहिताला प्राधान्य देणाऱ्या प्रश्नांची होती. काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे सहकारमंत्री आ. केशवराव सोनवणे यांच्या विरोधात बापूसाहेब काळदाते यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती.
उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच राष्ट्रसेवादलाच्या कार्यकर्त्यांनी जनकल्याण, राष्ट्रहिताच्या प्रश्नाला प्राधान्य देत प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवले होते. घरच्या भाकरी पदरी बांधून आम्ही या निवडणुकीचा प्रचार केला होता. निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रीय स्तरावरील डॉ. राममनोहर लोहिया, जॉर्ज फर्नाडीस हे लातुरात आले होते. राष्ट्रसेवादलाची चळवळ ही ग्रामीण भागातील मातीत रुजली होती. त्यातून शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थीमनावर राष्ट्रहिताचे संस्कार व्हायचे...त्यातूनच बापूसाहेब काळदाते यांच्या प्रचारासाठी आम्ही उन्हातान्हात खेडोपाडी पायपीट केली.
दोन्ही उमेदवारांच्या जाहीर सभांच्या माध्यमातून केवळ विचार-आचारांची देवणघेवाण होत असे. आज प्रचार सभांतून आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक होताना दिसून येत आहे. विकास, राष्ट्रहित आणि सर्वसमान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य या प्रचारसभा आणि निवडणूकीत देण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जिवनधर शहरकर गुरुजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आणि बापूसाहेब काळदाते ठरले विजयी...
बापूसाहेब काळदाते आणि केशवराव सोनवणे यांच्यात तटीतटीचा समाना झाला. लातुरातील टाउन हॉलच्या सभागृहात मतमोजणी झाली. मतमोजणीत शेवटपर्यंत दोघात टसल सुरु होती. मात्र, लातूर तालुक्यातील बोरी, ममदापूर, भातांगळी परिसरातून बापूसाहेब काळदाते यांना अधिक मते मिळाले आणि ४ हजार ४०० मताधिक्यांनी हे विजयी ठरले, अशी आठवण जिवनधर शहरकर गुरुजी यांनी सांगितली.