चारनंतरही बार सुरूच; छुप्या मार्गाने दारू विक्री !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:14 AM2021-07-22T04:14:07+5:302021-07-22T04:14:07+5:30
लातूर : दुपारी चारनंतर बाजारपेठेतील दुकाने, बीअर बार आणि दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही काही बारमधून छुप्या मार्गाने ...
लातूर : दुपारी चारनंतर बाजारपेठेतील दुकाने, बीअर बार आणि दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही काही बारमधून छुप्या मार्गाने दारू विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. पुढचे दार बंद आणि मागचे सुरू अशी स्थिती सध्या आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
दुपारी चारनंतर रात्री उशिरापर्यंत हा प्रकार सुरू राहत असल्याचे समोर आले आहे. यातून मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याचे पुढे आले आहे.
लातूर शहरातील चित्र
उड्डाण पूल परिसर
लातूर शहरातील उड्डाण पूल परिसरात काही बार आणि दारू दुकान दुपारी चार नंतरही सुरू असल्याचे दिसून आले. चारपूर्वी मद्यपींचा वावर समोरून होता. मात्र त्यानंतर पाठीमागच्या दाराने मद्यपींची सोय करण्यात आल्याचे दिसून आले.
बार्शी रोड
लातूर शहरातील बार्शी रोड मार्गावर काही ठिकाणी बारचे शटर अर्ध्यावर असल्याचे दिसून आले. या ठिकाणीही मद्यपींची तुरळक गर्दी दिसून आली. दुपारी चारनंतर गर्दी न करता काहींनी मद्यपींची सोय केल्याचे दिसून आले.
नांदेड रोड
लातूर शहरातील नांदेड रोडवरही काही ठिकाणी बार आहेत. यातील काही बारमध्ये पाठीमागच्या दाराने मद्यपींना दारू विक्री केली जात असल्याचे दिसून आले. समोरील दार बंद करून पाठीमागील दाराने हा प्रकार सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात काही ठिकाणी पहायला मिळत आहे.
शेजाऱ्यांना त्रास, तक्रार करूनही फायदा नाही
मद्यपींचा त्रास कोरोना काळात अनेक नागरिकांना वाढला आहे. परिणामी, याबाबत तक्रार केली तरी कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. - नागरिक
आम्ही ज्या परिसरात राहतो, त्या परिसरात काही मद्यपींनी गोंधळ घालणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले. याबाबत संबंधित पोलिसांकडे तक्रार केली तरी काही उपयोग झाला नाही. - नागरिक
तक्रार आली तर कारवाई करणार
स्थानिक नागरिकांना मद्यपींनी त्रास दिला. शिवाय, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांततेचा भंग केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. - निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक