मोबाईल हरवल्याचे कारण देत बार चालकास मारहाण करून लुटले; ११ जणांविरुध्द गुन्हा

By हरी मोकाशे | Published: March 15, 2023 07:03 PM2023-03-15T19:03:00+5:302023-03-15T19:04:17+5:30

बार चालकाकडील रोकड आणि सोन्याचा दागिना लुटला

Bar owner assaulted giving reason to losing mobile phone; Crime against 11 persons | मोबाईल हरवल्याचे कारण देत बार चालकास मारहाण करून लुटले; ११ जणांविरुध्द गुन्हा

मोबाईल हरवल्याचे कारण देत बार चालकास मारहाण करून लुटले; ११ जणांविरुध्द गुन्हा

googlenewsNext

उदगीर : शहरातील बिदर रोडवरील एका बारजवळ मोबाईल हरविल्याचे कारण सांगत गैरकायद्याने अकरा जण एकत्र जमून एकास चाकूने मारून रोख १ लाख १० हजार रुपये व अंगावरील ३ लाख ५० हजारांचे सोने असा एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात ११ जणांविरुध्द विविध कलमान्वये मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, शहरातील बिदर रोडवर फिर्यादी सत्यनारायण काशिनाथ बिरादार (रा. विकासनगर, उदगीर) यांचे हॉटेल बार आहे. ६ मार्च रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मोबाईल हरवला आहे, म्हणून आरोपी नरसिंग शिंदे, नितीन शिंदे, विरेश नागनाळे, अमर मच्छेल, माधव कुटुंबे, दीपक पवार, विनोद गाजदे, सचिन भालेराव, शिवा, संतोष, पिंटू सुतार (सर्वजण रा. उदगीर) हे गैरकायद्याने एकत्र जमले. त्यांनी फिर्यादी बिरादार यांना मारहाण केली. दरम्यान, पिंटू सुतार याने कत्तीच्या दांड्याने तर नरसिंग शिंदे याने चाकूने फिर्यादीस मारून जखमी केले.

तसेच फिर्यादीच्या खिशातील रोख १ लाख १० हजार रुपये आणि अंगावरील ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोने असा एकूण ४ लाख ६० हजारांच ऐवज जबरीने काढून घेऊन पळविला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बिरादार यांच्या फिर्यादीवरुन मंगळवारी रात्री उशिरा ग्रामीण पोलिस ठाण्यात वरील ११ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल हे करीत आहेत.

Web Title: Bar owner assaulted giving reason to losing mobile phone; Crime against 11 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.