दोन लाखाची खंडणी मागून बाजार समिती सचिवास मारहाण
By हरी मोकाशे | Published: November 28, 2022 06:43 PM2022-11-28T18:43:17+5:302022-11-28T18:45:19+5:30
उदगीरची घटना : एकाविरुध्द गुन्हा दाखल
लातूर : उदगीर बाजार समितीच्या सचिवास दोन लाखांची खंडणी मागून मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री १० वा.च्या सुमारास घडली. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात रविवारी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, फिर्यादी भगवान पाटील हे उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत सचिव म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी रात्री १० वा.च्या सुमारास शहरातील मुख्य चौकात आरोपी मनोज भिवाजी चिखले (रा. शेल्हाळ) याने सचिव पाटील यांना माझे बाजार समितीकडे ४ लाख ५० हजारांचे बिल प्रलंबित आहे. ते काढून द्या, असे म्हणाले. तेव्हा फिर्यादीने उद्या सकाळी कार्यालयात या, असे म्हणाले असता आरोपीने फिर्यादीचे काही न ऐकता तुला बघून घेतो, माझे बिल वगैरे काही नको. मला मेळावा आहे. त्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी दे अन्यथा बघून घेतो असे म्हणत फिर्यादीच्या तोंडावर चापटा मारल्या.
तसेच हाताच्या ठोशाने मारहाण केली. माझ्याविरुद्ध तक्रार केल्यास, तुझा जीव घेईन, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भगवान पाटील यांच्या फिर्यादीवरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी मनोज चिखले याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.