काळजी घ्या! लातूर जिल्ह्यात १६ हजार बालके विविध आजारांनी बेजार
By संदीप शिंदे | Published: February 28, 2023 06:20 PM2023-02-28T18:20:16+5:302023-02-28T18:21:21+5:30
जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानात दीड लाख बालकांची तपासणी पूर्ण
लातूर : अंगणवाडी तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ रहावे, पालकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने अभियान राबविले जात आहे. ९ फेब्रुवारीपासून या अभियानास सुरुवात झाली असून, आतापर्यंत १ लाख ६० हजार ९०९ बालकांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये १६६२८ बालके विविध आजारांनी बेजार असल्याचे समोर आले असून, यातील १२ हजार ४७६ जणांवर प्राथमिक औषधाेपचार करण्यात आले आहे.
जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त पथके तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील पथकांमार्फत जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील ५ लाख ५८ हजार १८२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोहीमेमध्ये ९ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यातील २५२२ पैकी ७१ अंगणवाड्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ० ते ६ वयोगटातील १ लाख ५३ हजार ६०३ बालकांपैकी ८ हजार ४२१ जणांची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील २ हजार २५१ पैकी १२८६ शाळांची तपासणी करण्यत आली असून, ६ ते १८ वयोगटातील ४ लाख ३ हजार ५७९ बालकांपैकी १ लाख ६० हजार ९०९ जणांची तपासणी झाली. यामध्ये १६ हजार ६२८ बालके विविध आजारांनी बेजार असल्याचे आढळून आले असून, १२ हजार ४७६ बालकांवर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहेत.
तसेच पुढील उपचाराकरिता ५ हजार ८९७ बालकांना संदर्भित करण्यात आले आहे. तर ४२ विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत बालकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी व उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सीईओ अभिनव गोयल, जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख, जिल्हा माता व बालसंगोपण अधिकारी डॉ. सतिष हरिदास यांनी केले आहे.
मार्चपर्यंत मोहीम संपविण्याचे आव्हान...
आरोग्य विभागाच्या वतीने जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान ९ फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. दोन महिने हे अभियान सुरु राहणार असून, यामध्ये शस्त्रक्रिया तसेच गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार आहे. दरम्यान, मार्च अखेरपर्यंत ही मोहीम पुर्ण करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असून, सध्या अभियानाला गती देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार बालके...
जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील ५ लाख ५८ हजार १८२ बालके आहेत. यात अंगणवाडीमधील १ लाख ५३ हजार ६०३ तर शाळांमधील ४ लाख ४ हजार ५७९ बालकांचा समावेश आहे. दरम्यान, आजारी आढळलेल्या १६ हजार बालकांपैकी १२ हजार जणांवर औषधोपचार झाले आहेत. यामध्ये खोकला, सर्दी, दात किडलेले, रक्ताक्षय, दृष्टीदोष, जन्मजात व्यंग आदी आजार असल्याचे निदर्शनास आले आहे.