काळजी घ्या! लातूर जिल्ह्यात आढळला कोरोनाचा एक रुग्ण
By हरी मोकाशे | Published: December 29, 2023 06:55 PM2023-12-29T18:55:45+5:302023-12-29T18:56:45+5:30
राज्यात काही दिवसांपासून कोविडचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.
लातूर : राज्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे धास्ती वाढली असली तरी लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. मात्र खबरदारी घ्यावी, असा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिला आहे.
राज्यात काही दिवसांपासून कोविडचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व शासकीय रुग्णालयांना दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमधील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडरसह इतर उपलब्ध साधनसामग्रीची पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी औसा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या अँटिजन तपासणीत एक ४० वर्षीय महिला डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सदर रुग्ण काही कामानिमित्ताने हैदराबाद येथे गेला होता. त्यास अंगदुखी, ताप, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळून आल्याने तपासणी करण्यात आली. त्यात संसर्ग झाल्याचे आढळून आले. सध्या त्यांच्यावर गृहविलगीकरणात उपचार सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून सांगण्यात आले.
गर्दीत जाणे टाळा, मास्क वापरा...
कोविडची लक्षणे अत्यंत सौम्य आहेत. त्यामुळे गर्दीत जाणे टाळावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स ठेवावा. शंका आल्यास तपासणी करून घ्यावी. सर्व शासकीय रुग्णालयांत तपासणी करण्यात येत आहे. हा विषाणू गंभीर स्वरूपाचा नाही.- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक
चाचण्या वाढल्या...
चार दिवसांपासून कोविडच्या चाचण्या वाढल्या आहेत. २५ रोजी ८, २६ रोजी ३६, २७ रोजी २१५ आणि २८ रोजी ३९२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी काळजी करू नये, मात्र दक्षता घ्यावी. अंगदुखी, ताप, खोकला, अशी लक्षणे दिसून आल्यास तपासणी करून घ्यावी. - डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी