काळजी घ्या! लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, गारपीटीचे संकेत
By संदीप शिंदे | Published: April 5, 2023 07:32 PM2023-04-05T19:32:10+5:302023-04-05T19:32:31+5:30
नागरिकांनी खबरदारी घ्यावी : जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन
लातूर : जिल्ह्यात ६ एप्रिल, गुरुवार राेजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ७ एप्रिल रोजी मेघगर्जना, वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत. त्यानुसार सर्व संबंधित नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात येणार आहे. तसेच या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी, नागरिक यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.
विजांच्या कडकडाटासह पाऊस व गारपीट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे, शेतकरऱ्यांनी दुपारी ३ ते ७ या वेळेत शेतीची व इतर कामे करू नये, या कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते, दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत, जलसाठ्याजवळ, नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये, शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे, काढणीसाठी ठेवलेली पिके सुरक्षितपणे झाकून ठेवावी. कार्यक्षेत्रातील गावांना सावधगीरीची सूचना देवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात व तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा, अशा सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. या कालावधीत कोणीही आपले मुख्यालय सोडू नये असे आदेशही देण्यात आले आहेत.