दीपोत्सव साजरा करताना सतर्कता बाळगावी; महावितरणचे आवाहन

By आशपाक पठाण | Published: November 7, 2023 07:01 PM2023-11-07T19:01:47+5:302023-11-07T19:02:09+5:30

आगीच्या दुर्घटना होणार नाहीत यासाठी घ्यावी काळजी

Be careful while celebrating Deepotsav; A call for distribution | दीपोत्सव साजरा करताना सतर्कता बाळगावी; महावितरणचे आवाहन

दीपोत्सव साजरा करताना सतर्कता बाळगावी; महावितरणचे आवाहन

लातूर : दिवाळी म्हणजे आनंदाचा व रोषणाईचा सण. या दीपोत्सवात घरांवर, व्यावसायिक प्रतिष्ठानांवर आकर्षक रोषणाई केली जाते. फटाके फोडले जातात. मात्र, या आनंद उत्सवात निष्काळजीपणामुळे आग लागण्याच्या घटना घडतात व परिणामी आनंदावर विरजण पडते. त्यामुळे दिवाळी साजरी करताना सावधगिरी बाळगूनच उत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

गत सप्ताहात गंजगोलाई परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याच्या तीन ते चार घटना घडल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर खाद्यसाठा साठवला असल्यामुळे उंदरांचा प्रादुर्भाव झाल्याने वायरिंग कट होऊन शॉर्ट सर्किट झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. त्याचबरोबर दिवाळीतील दिव्यांमुळे वीज वितरण व्यवस्थेवर भार पडतो, अशा स्थितीत विजेचा वापर आवश्यक तेवढाच झाला पाहिजे. दिवाळीला छोटीशी चूकही अपघाताला कारणीभूत ठरू शकते, अशा परिस्थितीत दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. दिवे लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा.

विद्युत उपकरणे दर्जेदार हवीत...
घर, उद्योग, कार्यालये, शेती आदी ठिकाणी वीज वापरताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. वीज पुरवठा घेताना किंवा वेळोवेळी विद्युत केबलस्वीचेस अथवा इतर उपकरणे ही आयएसआय प्रमाणित असल्याचे व योग्य क्षमतेचे असल्याची खात्री करावी. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नये. प्रमाणित ठेकेदारांकडूनच विद्युतीकरणाची कामे करून घ्यावीत. वायरिंगसाठी योग्य क्षमतेचे एमसीबी (मिनिएचर सर्किट ब्रेकर) वापरावे जेणेकरून अतिभार किंवा शॉर्टसर्किटमुळे धोका निर्माण होणार नाही. गुणवत्ता नियंत्रण मंडळाने प्रमाणित केलेली विद्युत उपकरणे वापरावीत.

...हे लक्षात असू द्या:
• रोषणाईसाठी कमी वॅटच्या एलईडी दिव्यांचा वापर करा.
• विद्युत सॉकेट्सवर अधिक भार टाकू नये.
• रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे, त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्यावे.
• वीज तारांजवळ फटाके उडवू नयेत.
• विजेच्या उपकरणांजवळ फटाके ठेवू नयेत.
• फटाके मोकळ्या जागेतच उडवावेत.
• फटाक्यांची आतषबाजी करताना आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात.
• फटाक्यांचा कचरा वीज यंत्रणेजवळ फेकू नका.

Web Title: Be careful while celebrating Deepotsav; A call for distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.