आधुनिक कबड्डीसाठी नवतंत्र अवगत करा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 11:29 PM2018-11-16T23:29:55+5:302018-11-16T23:31:31+5:30
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने : महा-कबड्डीसाठीही प्रयत्न होणे गरजेचे
महेश पाळणे
लातूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा कबड्डीत जरी असला तरी मातीवरची कबड्डी मॅटवर आली आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाशी नवोदित खेळाडूंनी जुळवून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून भारताची कबड्डी अधिक मजबूत होईल, असे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू तथा प्रो कबड्डीस्टार खेळाडू नितीन मदने यांनी सांगितले.
लातुरात सुरू असलेल्या पश्चिम विभागीय मुलींच्या आंतर विद्यापीठ स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त ते लातुरात आले असता त्यांनी ‘लोकमत’शी बातचित केली. यावेळी ते म्हणाले, माती व मॅटवर बराच फरक आहे. मॅटवर जरी मातीपेक्षा जास्त स्पीड मिळत असली, तरी दुखापतीचीही शक्यता मॅटवर अधिक आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक पुढे जावयाचे असल्यास मॅटच्या कौशल्याशी एकरुप होणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, मुंबईच्या तुलनेत मराठवाड्यातील खेळाडू कमी असले, तरी त्यांच्यात टॅलेन्ट आहे. केवळ प्रशिक्षकाअभावी त्यांच्या कौशल्याची वाढ खुंटते. यासह विविध स्पर्धेत अधिकाधिक भाग घेणे मराठवाड्यातील खेळाडूंसाठी गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक येथे डीवायएसपी पदावर असलेले नितीन यांनी खेळातही करिअर होत असल्याचे सांगून केवळ कबड्डीमुळेच क्लासवन आॅफिसर झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
महिलांसाठीही कबड्डी लीग खुली व्हावी...
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात होणारी महाकबड्डी लीग बंद आहे. पूर्वी दोन वर्ष ही स्पर्धा झाली. राज्य कबड्डी असोसिएशनने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून खेळाडूंची आर्थिक सोयही होईल आणि त्यांना व्यासपीठही मिळेल, यासह महिलांसाठी स्वतंत्र लीग राज्यात सुरू व्हावी, अशी अपेक्षाही नितीन मदने यांनी केली. यासह राज्यभरात कबड्डीचे क्लब वाढविणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.