प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यासाठी संवादात्मक बना- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर
By आशपाक पठाण | Published: August 1, 2023 09:53 PM2023-08-01T21:53:31+5:302023-08-01T21:53:42+5:30
महसूल सप्ताहाचे उद्घाटन
आशपाक पठाण, लातूर: महसूल विभाग हा प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. त्यामुळे शासनाच्या सर्वाधिक योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी ह्या विभागाकडे असून सर्वसामान्य जनतेच्या जीवनाला स्पर्श करणारा हा विभाग आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून संवेदनशीलपणे आणि संवादात्मक होऊन एकोप्याने काम करावे. प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी संवादात्मक बना, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
महसूल दिनी लातूर येथील भक्तीशक्ती मंगल कार्यालयात आयोजित महसूल सप्ताहाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कृष्णा चावरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, डॉ. सुचिता शिंदे, गणेश महाडिक, नितीन वाघमारे, प्रियंका कांबळे, अहिल्या गाठाळ, शोभा जाधव, रोहिणी नऱ्हे-विरोळे, प्रवीण फुलारी, प्रतीक्षा भुते, अविनाश कोरडे, सुशांत शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी ठाकूर म्हणाल्या, कार्यालयात समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांशी सुसंवाद ठेवून, त्यांची तक्रार केवळ कागद म्हणून न वाचता ती तक्रार मानवी दृष्टिकोन ठेवून समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. ‘ संवादात्मक आणि संवेदनशील प्रशासन’ अशी प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. प्रशासनाची जनतेच्या मनातील प्रतिमा उंचाविणे, हाच आपल्यासाठी खरा पुरस्कार असेल. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, नायब तहसीलदार वेरुळे, तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे भरत सूर्यवंशी, महसूल कर्मचारी संघटनेचे माधव पांचाळ, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी, तलाठी-मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष महेश हिप्परगे, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमजान मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी केले. सूत्रसंचालन उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी केले. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी आभार मानले.
असे उपक्रम सर्व विभागांमध्ये व्हावेत : पोलिस अधीक्षक सोमय मुंडे
वर्षभर शासकीय कर्तव्य पार पाडण्यासाठी राबणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याची संधी महसूल दिन सारख्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळते. आपल्या विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे, सर्वांना एकत्रित आणून त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महसूल दिन सारखे उपक्रम सर्वच शासकीय विभागांमध्ये आयोजित केले जावेत, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी यावेळी केले.
उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव..
गेल्या वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा महसूल दिनी सन्मान करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांचा उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे यांचा निवडणूक कामकाजात उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, नायब तहसीलदार संवर्गातील कुलदीप देशमुख, सुरेश पाटील, संतोष गुट्टे, धनेश दंताळे, रंगनाथ कराड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.