स्थलांतर करताय तर मुलांच्या शिक्षणाबाबत रहा निश्चिंत; 'शिक्षण हमी कार्ड' ने शिक्षणाची गॅरंटी!
By संदीप शिंदे | Published: November 18, 2022 07:03 PM2022-11-18T19:03:30+5:302022-11-18T19:03:44+5:30
शिक्षण हमी कार्ड द्वारे ऊसतोड मजूर, कामगारांची मुले येणार शिक्षणाच्या प्रवाहात
- संदीप शिंदे
लातूर : दिवाळीनंतर जिल्ह्यातून हजारो कामगार मजुरी, ऊसतोडणीसाठी परगावी स्थलांतरित झाले, तर काही कामगार दुसऱ्या गावात जाण्याच्या तयारीत आहेत. अशा कामगारांनी गाव सोडले तरी त्यांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट सुटू नये, याची गॅरंटी प्रशासन घेणार आहे. यासाठी स्थलांतर होणाऱ्या मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्यात येणार असून, राज्यातील कोणत्याही शाळेत या कार्डवर प्रवेश दिला जाणार आहे.
जिल्ह्यातील चाकूर, औसा, रेणापूर, जळकोट या तालुक्यामध्ये मजुरीसाठी दरवर्षीच स्थलांतर होते. कामगारांसोबत त्यांची मुलेही बाहेरगावी निघून जातात. त्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट सुटते. परिणामी, बालकांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत शिक्षण विभाग व अन्य विभागांच्या वतीने गावनिहाय सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये सापडणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे.
प्रत्येक गावांमध्ये होणार सर्वेक्षण...
प्रत्येक गावात जाऊन तेथील पालक स्थलांतरित झाले का किंवा होणार आहेत का, याची माहिती घेतली जाणार आहे. स्थलांतर होत असल्यास त्यांच्या मुलांना गावातच थांबविण्याची विनंती केली जाईल. मात्र, पालकांकडून नकार आल्यास मुलांना शिक्षण हमी कार्ड दिले जाणार आहे.
कार्डवर राहणार मुलांची संपूर्ण माहिती...
संबंधित मुलाची शिक्षण हमी कार्डवर शालेय रेकॉर्डवरील माहिती त्याच्या फोटोसह राहणार आहे. तो ज्या जिल्ह्यात किंवा गावात स्थलांतरित होईल, तेथील जवळच्या शाळेत हे कार्ड दाखविताच शिक्षणासाठी प्रवेश मिळणार आहे. दोन्ही ठिकाणचे मुख्याध्यापक एकमेकांशी संपर्क साधून स्टुडंट पोर्टलवर डिटॅच व अटॅच करणार आहे.
गावी परतल्यास कार्डवरच मिळणार प्रवेश...
रोजगाराचा कालावधी संपल्यानंतर संबंधित कुटुंब पुन्हा लातूर जिल्ह्यात परतल्यावर याच कार्डाच्या आधारे संबंधित विद्यार्थ्याला मूळ शाळेतही दाखल करून घेतले जाणार आहे. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत तालुकानिहाय प्रत्येक गावात जाऊन सर्वेक्षण होणार असून, त्यानंतर कार्यवाही केली जाणार आहे.
जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी...
स्थलांतरीत बालकांच्या सर्वेक्षणासाठी २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान गावनिहाय मोहीम राबविण्यात येणार आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी हा उपक्रम आहे. जिल्हास्तरावर सीईओंच्या मार्गदर्शनाखाली बैठक होणार असून, योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- वंदना फुटाणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी