शेतीच्या वाटणीवरून मंगरुळात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:14 AM2021-07-05T04:14:14+5:302021-07-05T04:14:14+5:30

आलमला शिवारातून पशुधनाची चोरी लातूर : शेतातील पत्र्याच्या गोठ्यात दावणीला बांधलेले तीन पशुधन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १९ ...

Beatings in Mangrul from agricultural allotments | शेतीच्या वाटणीवरून मंगरुळात मारहाण

शेतीच्या वाटणीवरून मंगरुळात मारहाण

Next

आलमला शिवारातून पशुधनाची चोरी

लातूर : शेतातील पत्र्याच्या गोठ्यात दावणीला बांधलेले तीन पशुधन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १९ ते २० जूनच्या दरम्यान आलमला शिवारात घडली. याबाबत औसा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद आहे. फिर्यादी असिफ चाँदसाब शेख (३९, रा. गौसपुरा, लातूर) यांनी शेतातील पत्र्याच्या गोठ्यात दावणीला दोन बैल व म्हैस बांधले होते. दरम्यान, ते अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत औसा पोलिसांत गुन्हा नोंद आहे.

सार्वजनिक ठिकाणी भांडण; गुन्हा दाखल

लातूर : सार्वजनिक ठिकाणी भांडण करून गोंधळ घातल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी गजानन पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, दिनेश रा. दामेवाले (२७, रा. फुलेनगर) आणि शेख मन्सूर अब्दुल आरशिदसाब (३३, रा. मुसानगर, उदगीर) हे दोघे पत्तेवार चौकात मागील भांडणावरून शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असताना आढळून आले. याबाबत उदगीर शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बसस्थानकातून दुचाकी पळविली

लातूर : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात थांबविलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना लातुरात घडली. याबाबत गांधी चौक पोलिसांत गुन्हा नोंद आहे. फिर्यादी संतोष पांडुरंग पवार (४५, रा. गोपाळनगर, रिंग रोड, लातूर) यांनी आपल्या ताब्यातील मोटारसायकल (एमएच २४ टी ७०३५) बसस्थानकात थांबविली होती. ती अज्ञाताने चोरून नेली. याबाबत गांधी चौक पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

मोबाइल हिसकावत चोरटे झाले पसार

लातूर : एका तरुणाच्या हातातील पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा अज्ञातांनी हिसकावत पळ काढल्याची घटना नवीन रेणापूर नाका ते रेल्वेस्थानक मार्गावर घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंद आहे. फिर्यादी हबिब हमिद शेख (२४, रा. संजयनगर, रेणापूर) हे नवीन रेणापूर नाका ते रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोबाइलवर बोलत थांबले होते. दरम्यान, दुचाकीवर आलेल्या दोघांनी मोबाइल हिसकावून पळ काढला. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंद आहे.

औसा शहरातून दुचाकी पळविली

लातूर : घरासमोर थांबविण्यात आलेली दुचाकी अज्ञातांनी पळविल्याची घटना औसा शहरात घडली. याबाबत अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद आहे. फिर्यादी विनोद विठ्ठल चव्हाण (३२, रा. वाघोली, ता. औसा) यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच २४ बीए ५९९२) घरासमोर थांबविली होती. ती अज्ञातांनी पळविली. याबाबत औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

कोळपण्याच्या कारणावरून तिघांकडून मारहाण

लातूर : शेतातील पिकात कोळपे मारण्याच्या कारणावरून एकास तिघांनी डोक्यात दगडाने मारून जखमी केल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील माकणी शिवारात शनिवारी घडली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी लक्ष्मण बालाजी फुलारी (६४) यांना गावातीलच नरसिंग संभाजी शिवपुजे याच्यासह अन्य दोघांनी संगनमत करून कोळपे मारण्याच्या कारणावरून डोक्यात दगडाने मारून जखमी केले. शिवाय, उजव्या दंडावर, पाठीत डाव्या हाताच्या बोटावर मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर शेताच्या धुऱ्यावर आल्यास ठार मारू, अशी धमकी दिली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औषधी दुकान फोडले; ५९ हजारांची रोकड लंपास

लातूर : शहरातील हत्ते नगर परिसरात असलेल्या एका औषधी दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दरम्यान, काउंटर आणि प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलेले ५८ हजार ९०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना २ ते ३ जुलैच्या दरम्यान घडली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी शेख अरबाज मोहम्मद (२४, रा. हत्तेनगर, लातूर) यांचे औषधी दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे २ जुलैच्या रात्री आपले दुकान बंद करून घराकडे गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरची लॉकपट्टी तोडून आत प्रवेश केला. दुकानातील काउंटर आणि प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवण्यात आलेले रोख ५८ हजार ९०० रुपये लंपास केले. शनिवारी सकाळी दुकानाकडे आल्यानंतर त्यांना आपले दुकान फोडल्याचे आढळून आले. घटनास्थळी गांधी चौक पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लालपरीला प्रवाशांचा प्रतिसाद

लातूर : शहर आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गावर सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला प्रवाशांतून प्रतिसाद मिळत आहे. लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारातून लांब पल्ल्यासह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर प्रवासी बससेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या पूर्णक्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याला मान्यता देण्यात आली आहे. परिणामी, प्रवाशांची सोय झाली आहे. मात्र अद्यापही ग्रामीण भागात काही मार्गांवर बससेवा सुरू झाली नाही.

फळबाजारात कचऱ्याचे ढीग

लातूर : शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या फळबाजार परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. परिणामी, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे संबंधित स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांतून केला जात आहे. कचरा वेळेवर उचलण्यात यावा, अशी मागणीही फळविक्रेत्यांसह नागरिकांतून होत आहे.

ग्रामीण भागात व्यवहार पूर्वपदावर

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या नियम आणि निर्बंधाचे पालन करीत ग्रामीण भागात छोटे-मोठे व्यवसाय सुरू झाले आहेत. सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत बाजारपेठेतील व्यवहार सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. सध्या दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जारी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि पोलीस कर्मचाऱ्यांची पथके तैनात आहेत.

Web Title: Beatings in Mangrul from agricultural allotments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.