पोलीस बनून आले, लुबाडून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 07:21 PM2020-10-09T19:21:30+5:302020-10-09T19:21:49+5:30
फिर्यादी बालाजी नारायण पाटील (५२ रा. हरिभाऊ नगर, लातूर) हे दि. ५ रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास घराकडे निघाले असताना दुचाकीवरुन पोलिसाच्या वेशभुषेत आलेल्या दोघांनी त्यांना नांदेड रोडवरील पोलीस वसाहतीनजीक अडविले.
लातूर : फिर्यादी बालाजी नारायण पाटील (५२ रा. हरिभाऊ नगर, लातूर) हे दि. ५ रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास घराकडे निघाले असताना दुचाकीवरुन पोलिसाच्या वेशभुषेत आलेल्या दोघांनी त्यांना नांदेड रोडवरील पोलीस वसाहतीनजीक अडविले. आम्ही पोलीस आहोत, तुम्ही हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या घालून, सोबत रोख पैसे बाळगून जात आहात, तुम्हाला धोका आहे, असे म्हणून विश्वासात घेत त्या दोघांनी बालाजी पाटील यांच्या हातातील २५ ग्रॅमच्या दोन अंगठ्या आणि रोख १९ हजार रुपये असा एकूण ७४ हजारांचा ऐवज एका हातरुमालात बांधला आणि हे सुरक्षितपणे ठेवा, अशी बतावणी करत हातरुमाल पुन्हा त्यांच्या हातात दिला.
मात्र या दरम्यान हातचालाखी करुन त्या भामट्यांनी पाटील यांच्या हातात नुसताच रूमाल ठेवला आणि दागिने लंपास करत तेथून निघून गेले. फसवणूकीचा प्रकार लक्षात येईपर्यंत दोघा जणांनीही तेथून पळ काढला होता.
याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन दोघा अज्ञात तोतया पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. विकास तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपो. नि. दयानंद पाटील पुढील तपास करत आहेत.