वळवाच्या तडाख्याने फुटलेल्या द्राक्षांच्या घडावर मधमाशांचा हल्ला; हाताशी आलेला घास हिरावला

By हरी मोकाशे | Published: April 8, 2023 05:26 PM2023-04-08T17:26:31+5:302023-04-08T17:26:55+5:30

वादळी वाऱ्यासह पाऊस; पावसामुळे द्राक्षाचे दरही पडले...

Bees attack a cluster of grapes burst by the rain of Walava in Latur | वळवाच्या तडाख्याने फुटलेल्या द्राक्षांच्या घडावर मधमाशांचा हल्ला; हाताशी आलेला घास हिरावला

वळवाच्या तडाख्याने फुटलेल्या द्राक्षांच्या घडावर मधमाशांचा हल्ला; हाताशी आलेला घास हिरावला

googlenewsNext

औराद शहाजानी / वलांडी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी तसेच देवणी तालुक्यातील वलांडी परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात शुक्रवारी रात्री जोरदार वळवाचा पाऊस झाला. त्यामुळे रबी ज्वारी, करडीसह भाजीपाला, द्राक्षे आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. निर्यातक्षम द्राक्षे मातीमोल झाले आहेत. द्राक्षांचे घड फुटल्याने त्यावर मधमाशा हल्ला करुन फस्त करीत आहेत.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह तगरखेडा, सावरी, माने जवळगा, हलगरा, म्हसाेबावाडी, संगारेड्डीवाडी, हालसी, काेयाजीवाडी, शेळगी, बाेरसुरी, देवणी तालुक्यातील वलांडी, हिसामनगर, जवळगा, हेळंब या भागात शुक्रवार व शनिवारी जाेरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडटात पाऊस झाला. त्यात रब्बी ज्वारीसह करडी, भाजीपाला, फळबागाचे मोठे नुकसान झाले.

तगरखेडा, सावरी, म्हसाेबावाडी येथील गोविंद बिरादार, गोपाळ पाटील, माणिक अंचुळे आदींच्या शेतातील द्राक्षाच्या बागेचे नुकसान झाले. जवळपास १५ एकरवरील द्राक्षे हे निर्यातीसाठी होते. अवघ्या दोन दिवसांत तोडणी करण्याचे नियोजन होते. मात्र, वादळी वारे आणि पावसाने द्राक्षांच्या घडांना मार लागला. त्यामुळे द्राक्षाची नासाडी झाली. दरम्यान, आद्रता वाढल्याने द्राक्षांची साल कमजोर होऊन गाेडवा कमी झाला. त्यामुळे द्राक्षे फुटली आहेत. आता त्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे.

औराद येथील शेतकरी सत्यवान मुळे, संताेष भंडारे यांच्या शेतातील शेवग्याच्या शेंगांची फुल गळती होऊन जमिनीवर सडा पडला आहे. तसेच अमाेल ढाेरसिंगे, भागवत उगिले, प्रदीप ढाेरसिंगे, उमाकांत भंडारे आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २४ तासात ६० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

पावसामुळे द्राक्षाचे दरही पडले...
वर्षभर लाखोंचा खर्च करून बाग मुलाप्रमाणे जपली. तोडणीवेळी अवकाळी पाऊस होऊन हाता- ताेडांशी आलेला घास हिरावला. माझ्या तीन एकर बागेत २० टन द्राक्षे विक्रीसाठी तयार होते. एक किलाे द्राक्षासाठी २५ रुपये खर्च झाला आहे. सततच्या पावसामुळे पदरात १५ ते २० रुपये प्रति किलो असा दर पडत आहे. शिवाय, निम्मी द्राक्षे खराब झाली असून एका घडाला १० ते १५ मधमाशा बसून रस शाेषण करीत आहेत.
- गोविंदराव बिराजदार, शेतकरी.

वीज पडून सात शेळ्या दगावल्या...
देवणी तालुक्यातील जवळगा येथील राम बालुरे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडली. त्यात दोन शेळ्या दगावल्या. तसेच हिसामनगर येथील भरत वाघमारे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडली. त्यात एका शेळीसह चार पिल्ले दगावले. त्याचबरोबर हिसामनगर येथील दोन घरांवरील पत्रे उडून गेल्याने धान्य भिजले.

नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी...
वलांडीसह हिसामनगर, जवळगा, हेळंब परिसरात शुक्रवारी मध्यरात्री जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. हिसामनगर- हेळंब रस्त्यावरील पुलाचा कठडा पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. बाळासाहेब डिगोळे यांच्या शेतातील शेडवर बाभळीचे झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी तहसीलदार सुरेश घोळवे, मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे, तलाठी अतिश बनसोडे, कृषी सहाय्यक बंडगर, सरपंच विजयकुमार मुखे, सरपंच हनुमंत बिरादार, सरपंच सोपान शिरसे आदींनी केली.

Web Title: Bees attack a cluster of grapes burst by the rain of Walava in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.