सिनेस्टाईल पाठलात करत उत्पादनक पथकाने पकडला दारूसाठा
By राजकुमार जोंधळे | Published: October 1, 2023 08:34 AM2023-10-01T08:34:25+5:302023-10-01T08:35:40+5:30
चालकाला अटक : १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर : गस्तीवर असलेल्या राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या पथकाला एक वाहन भरधाव गेल्याचे आढळून आले. त्यांनी या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते वेगात गेल्याने संशय अधिक बळावला. या वाहनाचा आष्टामाेड, नळेगाव ते उदगीरदरम्यान त्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करत उदगीरातील उमा चाैकात वाहनासह १६ लाखांचा दारूसाठा जप्त केला. यावेळी चालकाला अटक केली असून, ही कारवाई शनिवारी पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या पथकाने केली.
लातूर येथील राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या आदेशानुसार आष्टामाेड ते उदगीर मार्गावर, परिसरात उत्पादन शुक्ल विभागाचे पथक गस्तीवर हाेते. दरम्यान, शनिवारी पहाटेच्या सुमारास आष्टामाेड येथे पथकाला महिंद्रा पिकअप वाहन संशयास्पद भरधाव येताना आढळून आले. पथकाने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने महिंद्रा पिकअप (एम.एच. २३ ए.यू. ३०४४) न थांबविता नळेगाव मार्गावरून उदगीरच्या दिशेने सुसाट पळविली. पथकानेही त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला. अखेर उदगीरातील उमा चाैकात वाहनासह चालकाला पकडण्यात पथकाला यश आले. वाहनाची झाडाझडती घेतली असता, २२० बनावट देशी दारूचे बाॅक्स, प्लास्टिकचे ५० कॅरेट आणि वाहनासह एकूण १६ लाख ५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, वाहनासह चालकाला अटक केली आहे. याबाबत एकाविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुक्ल विभाग, उदगीर येथील निरीक्षक आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक स्वप्निल काळे, ए. बी. जाधव, एल. बी. माटेकर, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, जवान ज्याेतीराम पवार, एस. जी. बाेगेलवाड, संताेष केंद्र, वाहनचालक विक्रम परळीकर यांच्या पथकाने केली. तपास निरीक्षक आर. एम. चाटे करत आहेत.