मालकासोबत विश्वासघात, मुनिम २० लाखांच्या रोकड दागिन्यांसह फरार
By हरी मोकाशे | Published: November 9, 2022 07:02 PM2022-11-09T19:02:32+5:302022-11-09T19:07:09+5:30
निमाने मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा उचलत झाला फरार
उदगीर (जि. लातूर) : येथील एका अडत दुकानात काम करणाऱ्या मुनिमाने मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा उचलत रोख रक्कम व सोन्याची अंगठी असा एकूण १९ लाख ४४ हजार ७०३ रुपये लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा उदगीर शहर पोलीस ठाण्यात मुनिमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, उदगीरातील मार्केट यार्डात निवृत्ती नारायण मुंडे या नावाने असलेल्या अडत दुकानात संतोष शांतलिंग स्वामी (रा. माळेवाडी, ता. उदगीर) हा मुनिम म्हणून कामाला होता. २ सप्टेंबर २०२२ ते २२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत आरोपीने एसबीआय बँकेच्या १८ धनादेशाद्वारे पैसे उचलले. तसेच दुकानातील सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम असा एकूण १९ लाख ४४ हजार ७०३ घेऊन पसार झाला. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा दुकान मालक सुदर्शन मुंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले