फुकट्या प्रवाशांनाे सावधान; राेज ४४४ बसची तपासणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:21 AM2021-09-27T04:21:39+5:302021-09-27T04:21:39+5:30
लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारातील जवळपास ३०० बस सध्या विविध मार्गांवर सुसाट आहेत. काही बस ...
लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारातील जवळपास ३०० बस सध्या विविध मार्गांवर सुसाट आहेत. काही बस लांब पल्ल्याच्या मार्गावर धावत आहेत. या बसमधून काही प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे आढळून आले आहे. हा प्रकार राेखण्यासाठी महामंडळाच्या वतीने खास माेहीम हाती घेण्यात आली आहे. एका पथकात ३ जणांचा समावेश आहे. ११ पथकांमध्ये ३३ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका पथकाकडून किमान ३५ ते ४० बसची दरराेज तपासणी केली जात आहे.
प्रवास भाड्याच्या दुप्पट किंवा १०० रुपयांचा दंड...
लातूर विभागातील वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या बसमधून फुकट प्रवास करणाऱ्यांना प्रवास भाड्याच्या दुप्पट किंवा १०० रुपयांचा दंड आकारला जाताे.
विनातिकीट प्रवास करू नये, याबाबत प्रवाशांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतरही काेणी फुकट प्रवास केला, तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
महामंडळाच्या ११ पथकांकडून विविध मार्गांवर बस तपासणी केली जात आहे. दिवसभरात ३५ ते ४० बसची तपासणी एका पथकाकडून केली जात आहे.
प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष माेहीम...
महामंडळाच्या बसने फुकट प्रवास करणाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष माेहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी मार्ग तपासणीची ६ पथके आणि त्या-त्या आगारातील एक, अशी एकूण ११ पथके सध्या कर्तव्यावर आहेत. त्यांच्याकडून दरराेज किमान ४४४ बस तपासल्या जात आहेत. यातून दंडही वसूल केला जात आहे.
- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, लातूर
५० हजारांचा दंड वसूल...
१ लातूर विभागातील विविध मार्गांवर ११ पथकांकडून वाहन तपासणी माेहीम राबविली जात आहे. या पथकांकडून फुकट्या प्रवाशांना दंड केला जात आहे. गत पाच दिवसांत जवळपास ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
२ जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गांवर तपासणी माेहीम राबविण्यात येत आहे. अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले आहेत.
३ प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, वाहकाला तिकूट मागून घ्यावे, सुटे पैसे तपासून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.