फेसबूकवरुन पैशांची मागणी झाली तर सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:20 AM2021-05-18T04:20:58+5:302021-05-18T04:20:58+5:30
लातूर : दुसऱ्याच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडून संबंधितांच्या नावाने पैसे मागण्याचे प्रकार समोर आले आहेत. यात दुसऱ्याच्या नावे ...
लातूर : दुसऱ्याच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडून संबंधितांच्या नावाने पैसे मागण्याचे प्रकार समोर आले आहेत. यात दुसऱ्याच्या नावे फसवणूक होत असून ऑनलाईन पैसे खात्यात टाकण्यास सांगितले जात आहे. फेसबुक अकाऊंटवरील एखाद्या व्यक्तीचा फोटो घेवून त्याच्या नावे खाते तयार केले जात आहे. या फेसबुक खात्याची फ्रेन्ड रिक्वेस्ट संबधिताच्या यादीतील मित्रांना पाठवली जात आहे. परिचिताचा फोटो पाहून अनेकजण फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारतात. फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारताच फेसबुक मॅसेंजरवरुन कसे आहात? असा मेसेज पाठवला जात आहे. त्यानंतर संभाषण वाढवून एखादे कारण सांगून पैशाची गरज असल्याचे समोरच्याला सांगितले जात आहे. घेतलेले पैसे लगेच परत करतो, असे सांगून ऑनलाईन पैसे पाठविण्याची विनंती केली जात आहे. त्याचवेळी खाते क्रमांक आणि पैसे टाकण्यासाठी मोबाईल क्रमांकही दिला जात असून त्या खात्यावर पैसे जमा करण्याची विनंती केली जात आहे. काही जण शहानिशा न करताच भावनेच्या भरात पैसे ऑनलाईन खात्यावर जमाही करत आहेत. यातून इतरांच्या नावे फसवणूक केली जात असून हा सर्व प्रकार ऑनलाईन सुरू आहे. याबाबत अनेकजण तक्रारी करत आहेत. पण तक्रारी न करणाऱ्यांचेच प्रमाण जास्त आहे. त्यामुळे फसवणुकीला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे.
परिचयातील व्यक्तीच्या नावाचाच वापर...
१. फेसबुकवर ज्याच्या प्रोेफाईल लॉक नाहीत अशा खातेधारकांचा फोटो घेऊन बनावट खात्याला जोडला जातो. आणि संबधित व्यक्तीच्या यादीतील मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. अनेक जण ती स्विकारताच पैशाची मागणी करणारे संदेश प्राप्त होत आहेत. यामध्ये दवाखान्याचे तात्काळ काम आहे, उद्या सकाळीच पैसे परत करतो, खुप गरज आहे लवकर पैसे पाठवा असे संदेश पाठविले जात आहे. ज्यांना या प्रकाराविषयी माहिती नाही ते याला बळी ठरत आहे.
२. जिल्हा पोलीस दलाकडे मागील वर्षी ऑनलाईन फसवणुकीचे एकूण ३१ गुन्हे दाखल झाले आहे. यामध्ये फेसबुकच्या माध्यमातून फसवणूक झालेले ४ गुन्हे दाखल आहेत. याबाबत तपास केला जात आहे. मात्र, प्रत्येकाने स्व:ताची फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे. असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
३. बहूतांश वेळा ओळखीच्या व्यक्तीने फेसबुक संदेशाद्वारे पैसे मागितल्यावर काही जण तात्काळ पैसे पाठवितात. मात्र, त्याची खातरजमा करणे गरजेचे आहे. अनेकदा फेसबुक खाते हॅक होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सोशल मिडिया हाताळताणा योग्य खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.
अशी घ्या काळजी...
फेसबुक खात्यावरुन पैशांची मागणी झाल्यास तात्काळ संबधित मित्रास यांची कल्पना द्यावी, त्याच्याकडून खात्री करुन घ्यावी. प्रकरण गंभीर असल्यास फेसबुक हॅककरुन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाकडे तक्रार करणे आवश्यक आहे. प्रत्येकांने आपली माहिती अनोळखी व्यक्तीला फोनद्वारे देणे टाळावे. कोणत्याही प्रकारची फसवणुक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार करावी.
आमिषाला बळी पडू नका...
सध्या ऑनलाईन पद्धतीने फसवणूकीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. दूप्पट पैसे करुन देतो, अर्जंट दवाखान्याचे काम आहे बँक खात्यावर पैसे पाठवा, तूम्हाला आवश्यक असलेली औषधी तात्काळ पुरवठा करतो या नंबरवर पैसे पाठवा अशा आमिषाला कोणाीही बळी पडू नये. प्रत्येकाने ऑनलाईन व्यवहार करताना सतर्कता बाळगावी.- निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक
वर्षभरात सायबर पोलीसांकडे दाखल झालेल्या तक्रारी - ३१
फेसबुकवरुन फसवणूक झालेल्या तक्रारी - ०४