भालेरावांनी भाजपाचा गड राखला

By Admin | Published: October 20, 2014 12:19 AM2014-10-20T00:19:29+5:302014-10-20T00:32:54+5:30

चेतन धनुरे ,उदगीर उदगीर : तब्बल पंचेवीस वर्षानंतर आता पुन्हा एकदा उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासाची फेरमांडणी करावी लागणार आहे़ दुसऱ्यांदा संधी नाकारणाऱ्या येथील मतदारांनी विद्यमान

Bhalerao retained the BJP's fortress | भालेरावांनी भाजपाचा गड राखला

भालेरावांनी भाजपाचा गड राखला

googlenewsNext


चेतन धनुरे ,उदगीर
उदगीर : तब्बल पंचेवीस वर्षानंतर आता पुन्हा एकदा उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासाची फेरमांडणी करावी लागणार आहे़ दुसऱ्यांदा संधी नाकारणाऱ्या येथील मतदारांनी विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांच्यावर विश्वास दाखवीत भाजपाच्या पारड्यात सलग दुसऱ्यांदा आपले माप टाकले़ भालेरावांची नैैय्या पार करण्यात मोदी लाट कारणीभूत ठरली असली तरी त्यांना काँग्रेसचाही अदृश्य ‘हात’भार लागला़
युती-आघाडी तुटल्याने उदगीर मतदारसंघात चौरंगी लढत रंगणार, असा माहोल प्रचाराने तयार झाला होता़ परंतु, अखेरच्या दोन दिवसात सगळाच नूर पालटला़ शेवटच्या टप्प्यात तिरंगी झालेल्या लढतीत विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांनी बाजी मारली़ जपलेली प्रतिमा अन् मोदी लाट भालेरावांच्या माथी विजयतिलक लावून गेली़ जशा या बाबी त्यांच्या विजयाला कारणीभूत ठरल्या तितकेच काँग्रेस व राष्ट्रवादीतील मतविभाजनही प्रमुख कारण ठरले़ पहिल्या टप्प्यापासूनच राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती़ तुलनेने काँग्रेसची यंत्रणा पुरती ढेपाळली होती़ स्थानिक नेतृत्व बसवराज पाटील नागराळकर हे राष्ट्रवादीकडून निलंग्यातील रणमैदानात उतरल्याने त्यांची उदगीरची यंत्रणा निलंग्यात तळ ठोकून होती़ तरीही शेवटच्या दोन दिवसात काँग्रेसने ‘दंड’बैैठका काढत राष्ट्रवादीकडे वळलेल्या मतदारांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले़ त्यामुळे राकाँचा जोर ओसरत गेला़ तगडा स्पर्धक मानल्या गेलेल्या राष्ट्रवादीतील हवा काढण्याचे काम काँग्रेसकडून झाल्याने या बाबीचा अप्रत्यक्ष फायदा भाजपालाच झाला़ तसेच भाजपाचे माजी आमदार गोविंद केंद्रे यांचा रुसवा गडकरींच्या उपस्थितीत अन् मतदारांच्या साक्षीने शेवटच्या टप्प्यात दूर झाल्याचाही काहिसा फायदा भालेराव यांना झाला़ माजी आमदार मनोहर पटवारी यांनी मेहनत घेऊनही सेनेचे रामचंद्र अदावळे यांचा बाण अर्ध्या वाटेतच अडखळला़ रविवारी सकाळी मोठी उत्कंठा घेऊन उदगीरच्या आयटीआय परिसरात जमलेल्या कार्यकर्ते, मतदारांना फारसा चढ-उतार अनुभवण्यास मिळाला नाही़ अगदी टपाली मतापासून ते शेवटच्या फेरीपर्यंत भाजपाची लीड कुठेही खंडीत झाली नाही़ भालेरावांचा पुढचा राजकीय प्रवास नव्याने सुरु झाला आहे़ त्यांना या निवडणुकीत ६६ हजार ६८६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय बनसोडे यांना ४१ हजार ७९२ मते मिळाली आहेत.

Web Title: Bhalerao retained the BJP's fortress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.