सहाय्यक निबंधकांची मोठी कारवाई, अवसायनामध्ये निघालेल्या ३७२ दूध संस्थांची नोंदणी रद्द
By हरी मोकाशे | Published: November 30, 2023 05:55 PM2023-11-30T17:55:53+5:302023-11-30T17:56:37+5:30
जिल्ह्यात एकूण ६५९ सहकारी दूध संस्था असल्या तरी त्यातील बहुतांश संस्था सन २०१४- १५ पासून अवसायनात आहेत.
लातूर : काही वर्षांपासून अवसायनात असलेल्या जिल्ह्यातील सहकारी दूध संस्थांना नोंदणी रद्द करण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. ३० दिवसांच्या मुदतीत एकही आक्षेप सादर न झाल्याने अखेर सहाय्यक निबंधकांनी (दूध) दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ३७२ सहकारी दूध संस्थांची नोंदणी रद्द केली आहे.
जिल्ह्यात एकूण ६५९ सहकारी दूध संस्था असल्या तरी त्यातील बहुतांश संस्था सन २०१४- १५ पासून अवसायनात आहेत. त्यामुळे शासन निर्देशानुसार अवसायनातील सहकारी दूध संस्थांना नोटिसा बजावण्यात येऊन आक्षेप सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत एकही आक्षेप सादर न झाल्याने अखेर ३७२ सहकारी दूध संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात १८० दूध संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली होती.
निलंगा तालुक्यात सर्वाधिक दूध संस्था...
तालुका - नोंदणी रद्द संस्था
लातूर - ८४
औसा - ६१
उदगीर - ४७
निलंगा - ११२
चाकूर - ०९
जळकोट - ०५
रेणापूर - ०७
अहमदपूर - १९
देवणी - २५
शिरुर अनंत. - ०३
एकूण - ३७२
कुक्कुटपालन, वराह पालन संस्थावरही कार्यवाही...
सहकारी दूध संस्थांबरोबरच कुक्कुटपालन करणाऱ्या जिल्ह्यातील २७ आणि वराह पालन करणाऱ्या १९ सहकारी संस्थांचीही नोंदणी रद्द करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण ४१८ संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना धक्काच बसला आहे.
पत्ता एका ठिकाणचा, कार्यालय दुसरीकडे...सहकारी दूध संस्थेचे कार्यालय नोंदणीकृत पत्त्यावर नसणे.
आर्थिक वर्ष संपल्यानंतरही ४५ दिवसांच्या आत आर्थिक पत्रके सादर न करणे.
लेखापरीक्षण करुन न घेणे.
संस्थेची निवडणूक घेण्यासाठी मतदार यादी व निधी सादर न करणे.
कलम ६९ मधील तरतुदीनुसार अनिवार्य विवरणपत्र महा सरकार या संकेतस्थळावर अपलोड न करणे, अशा विविध कारणांनी ४१८ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
आतापर्यंत एकूण ५९८ संस्थांवर कार्यवाही...
पशसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी ज्या संस्था बंद आहेत, अशा संस्थावर कारवाई करुन त्या संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अवसायनातील ३७२ सहकारी दूध संस्थांवर, २७ कुक्कुटपालन संस्थांवर तर १९ वराह पालन सहकारी संस्थांवर कार्यवाही करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ५९८ संस्थांवर कार्यवाही पूर्ण झाली आहे.
नियमानुसार काम न करणाऱ्या संस्थांवर कार्यवाही...
सहकार कायद्यातील तरतुदीनुसार ज्या संस्था कामकाज करीत नाहीत, अशा सर्व संस्थांवर कारवाई करावी, असे आदेश पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिले होते. त्यानुसार दोन टप्प्यांत अवसायनातील सहकारी संस्थांना नोटिसा बजावून आक्षेपासाठी मुदत देण्यात आली होती. कुठलाही आक्षेप सादर न झाल्याने कार्यवाही करण्यात आली आहे.
- एम.एस. लटपटे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दूध).