लातूर महापालिकेचा मोठा निर्णय; एक रकमी मालमत्ता कर भरल्यास व्याजात शंभर टक्के सूट
By हणमंत गायकवाड | Published: March 13, 2024 04:47 PM2024-03-13T16:47:21+5:302024-03-13T16:48:07+5:30
३१ मार्चपूर्वी चालू व थकित करभरणा करणे आवश्यक
लातूर : थकीत मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना मनपाकडून अनोखी सवलत देण्यात येत असून ३१ मार्चपूर्वी आपल्या कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांचे कराच्या रकमेवर आकारण्यात आलेले संपूर्ण व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे कर थकलेला आहे.अनेकवेळा सूचना करून व नोटीसा देऊनही या कराचा भरणा करण्यात आलेला नाही. त्यामुळे मनपाने थकीत करावर २ टक्के व्याज आकारलेले आहे. तरी देखील मालमत्ता कराचा भरणा होत नसल्याने मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी नियम ५१ अन्वये व्याजामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार मालमत्ता धारकांनी आपल्याकडील थकीत व चालू कराचा एकरकमी भरणा ३१ मार्च २०२४ पूर्वी केला तर अशा मालमत्ताधारकांना व्याजातून १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेत शहरातील मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकीत व चालू मालमत्ता कराचा एकत्रित भरणा पालिकेकडे करावा,असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.सवलत देऊनही जे नागरिक कर भरणा करणार नाहीत त्यांच्या मालमत्ता सील केल्या जातील.संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही केली जाईल.त्यामुळे मालमत्ता धारकांनी आपल्याकडील करांचा भरणा मनपाकडे करून मनपास सहकार्य करावे,असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
संघटनांच्या पाठपुराव्याला आले यश...
मालमत्ताकराच्या व्याजात सूट मिळावी, अशी मागणी विविध संघटनांनी आयुक्तांकडे केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी, स्थायी समितीचे माजी सभापती ॲड. दीपक मठपती यांच्यासह अनेकांनी सूट देण्याची मागणी केली होती.