मोठी बातमी: लातूर बस अपघातप्रकरणी गुन्हा दाखल; कारणीभूत ठरलेल्या दुचाकीचालकाला उचलले
By राजकुमार जोंधळे | Updated: March 4, 2025 21:50 IST2025-03-04T21:50:40+5:302025-03-04T21:50:58+5:30
दुचाकीस्वाराला चाकूर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले आहे. सध्या कसून चौकशी सुरु आहे.

मोठी बातमी: लातूर बस अपघातप्रकरणी गुन्हा दाखल; कारणीभूत ठरलेल्या दुचाकीचालकाला उचलले
राजकुमार जाेंधळे, चाकूर (जि. लातूर) : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपाटी (ता. चाकूर) येथे सोमवारी दुपारी एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अहमदपूर आगाराची बस उलटली. या अपघातात ४१ प्रवासी जखमी झाले. त्यातील दोघांना कायमचे अपंगत्व आले आहे. दरम्यान, ज्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयात्नात हा अपघात झाला. त्या दुचाकीस्वाराला चाकूर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले आहे. सध्या कसून चौकशी सुरू आहे.
पाेलिसांनी सांगितले की, अहमदपूर येथून लातूरकडे मार्गस्थ झालेली बस (एम.एच. २० बी.एल. १६१३) दुपारी नांदगाव पाटीनजीक आली. यावेळी एक दुचाकीस्वार रस्ता ओलांडत होता. ताे रस्ता ओलांडताना ना इंडीकेटर दाखविले, ना हात दाखिवले. त्याने अचानक आपली दुचाकी जानवळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळविली. अचानकपणे समाेर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालक नामदेव नरवटे यांचे नियंत्रण सुटले आणि बस दुभाजकावरुन चढून रस्त्यावर उलटली. बस उलटल्याचे पाहता दुचाकीस्वाराने घटनास्थळावरुन धूम ठाेकली. आष्टामाेड नजीक असलेल्या टोल नाक्यावरील सीसीटीव्हीत हा थरार कैद झाला. या प्रकरणी बसचालकाच्या तक्रारीवरुन अज्ञात दुचाकीचालकाविराेधात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.
चाकूरचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउपनि. राजाभाऊ घाडगे यांनी तपासाला गती दिली. नाक्यासह आष्टामाेड आणि इतर ठिकाणच्या सीसीटीव्हींच्या फुटेजची पाहणी केली. रेणापूर तालुक्यातील तुकाराम नागनाथ पल्ले (वय ७९) हे एका कार्यक्रमासाठी दुचाकीवरून घरणी येथे आले होते. दरम्यान, कार्यक्रम आटाेपल्यानंतर ते गावाकडे जात हाेते. नांदगावपाटी येथे आपल्यानंतर जानवळकडे दुचाकी वळविताना अचानक बससमाेर आले. याच दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस उलटली. या अपघात प्रकरणात तुकाराम पल्ले यास चाकूर पाेलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले असून, कसून चाैकशी सुरु आहे.
चार प्रवासी गंभीर; लातुरात उपचार सुरु
अपघातातील जखमी ४१ पैकी २६ प्रवाशांना उपचारानंतर साेमवारी रात्री सुटी देण्यात आली. उर्वरित १५ पैकी चार प्रवासी गंभीर आहेत. यातील प्रिती कानवटे, व्यंकट भोगे यांना कायमचे अपंगत्व आले. तर अनुसया रामपटवार, इंदूबाई मडगेयांना जबर मार लागला. जखमींवर लातुरातील शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. - डॉ. सचिन जाधव, लातूर