बँकेची आधी वीज बंद केली, नंतर गॅसकटरने तिजोरी कापली; १८ लाख रोख, ३ किलो सोने लंपास
By आशपाक पठाण | Published: December 16, 2023 06:39 PM2023-12-16T18:39:57+5:302023-12-16T18:42:17+5:30
बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे दरोडेखोरांनी बँकेतील वीजपुरवठा खंडित केला होता.
औराद बाऱ्हाळी (जि. बिदर) : कमलनगर तालुक्यातील तोरणा येथील एसबीआयबँकेच्या शाखेत दरोडा टाकून १८ लाख व ३ किलोग्रॅम वजनाचे तारण ठेवलेले सोने लुटल्याची घटना घडली आहे. शनिवारी पोलिस अधीक्षक घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी तीन पथकांची नेमणूक करून त्यांना कामाला लावले आहे.
तोरणा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शुक्रवारी सकाळी बँकेचे कर्मचारी बँक उघडून आत प्रवेश केल्यानंतर बँकेवर दरोडा पडल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ कमलनगर पोलिसाना संपर्क साधून दरोडा पडल्याचे सांगितले. पोलिस येईपर्यंत कोणीही आत प्रवेश केला नाही. बँकेत गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी खिडकीची काच फोडून रॉड कापून बँकेत प्रवेश मिळवला. बँकेतील तिजोरी गॅस कटरने कापून त्यातील १८ लाख ३६ हजार ७९३ रोख रक्कम व तारण असलेले ३ किलोग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी पळविल्याची घटना घडली आहे.
दरोडेखोरांनी वीजपुरवठा केला खंडित...
बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे दरोडेखोरांनी बँकेतील वीजपुरवठा खंडित केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस महानिरीक्षक अजय हिलोरी, पोलिस अधीक्षक चन्नबसवण्णा लंगोटे, उपाधीक्षक शिवानंद पावाडशेट्टी यांनी तात्काळ भेट देऊन अज्ञात दरोडेखोरांच्या तपासासाठी श्वान पथक पाचारण करण्यात आले. मात्र, तपासात श्वान पथकाला यश मिळाले नाही. उपाधीक्षक पावाडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करण्यात आली असून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधकार्य तीव्र करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दोन महिन्यांपूर्वीच सुरक्षेसंदर्भात बैठक....
जिल्ह्यातील बँकाच्या सुरक्षासंबंधी दोन महिन्यांपूर्वी बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यात बँकांनी सुरक्षारक्षक नेमणूक, लॉकर सुरक्षा व भिंतीवरील आलार्म आदींची व्यवस्था करावी अशा सुरक्षेसंदर्भात सूचना केल्या होत्या. मात्र, बँक प्रशासनाने सुरक्षेच्या बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. अन्य बँकाही सुरक्षासंबंधींची अंमलबजावणी करावी अशा सूचना केल्या असल्याचे पोलिस अधीक्षक चन्नबसवण लंगोटे यांनी सांगितले.