मोठी बातमी: लातुरातील बहुचर्चित खून प्रकरणातील फरार आराेपीला साेलापूर जिल्ह्यातून उचलले

By राजकुमार जोंधळे | Updated: December 24, 2024 21:24 IST2024-12-24T21:23:58+5:302024-12-24T21:24:22+5:30

खबऱ्याने दिलेल्या माहितीची पडताळणी करून विशेष पाेलिस पथक साेलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका गावात धडकले.

Big news The absconding accused in the murder case in Latur was Arrested from Solapur district | मोठी बातमी: लातुरातील बहुचर्चित खून प्रकरणातील फरार आराेपीला साेलापूर जिल्ह्यातून उचलले

मोठी बातमी: लातुरातील बहुचर्चित खून प्रकरणातील फरार आराेपीला साेलापूर जिल्ह्यातून उचलले

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील गंजगाेलाईत एका तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना १० ऑक्टाेबर २०२४ राेजी घडली हाेती. दरम्यान, या बहुचर्चित खून प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मंगळवेढा (जि. साेलापूर) तालुक्यातील एका गावातून मंगळवारी अटक केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील गंजगोलाई परिसरात १० ऑक्टाेबर २०२४ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास आरोपी सुलतान गफार कुरेशी (रा. शहावली मोहल्ला, लातूर) याने पैगंबर हाजीमलंग सय्यद (२८, रा. बाभळगाव ता. लातूर ह.मु. अंजली नगर, लातूर) या मित्रासाेबत शुल्लक कारणावरून वाद झाला. याच वादातून पैगंबर सय्यद याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुरनं. ६५३/२०२४ कलम १०३ (१) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा घडल्यापासून आरोपी सुलतान कुरेशी हा पाेलिसांना गुंगारा देत फरार होता. जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी आराेपीच्या अटकेचे आदेश दिले. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. संजीवन मिरकले, रियाज सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सायबर सेलचे गणेश साठे, संतोष देवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हैदराबाद, बिदर, बीड, साेलापुरात घेतला शाेध...

पाेलिस पथकाकडून फरार आराेपी वास्तव्य करण्याची शक्यता असलेल्या हैदराबाद, बिदर, सोलापूर, उदगीर, बीड शहरात शाेध घेण्यात आला. दरम्यान, आराेपी कोणत्याही नातेवाइकांच्या संपर्कात नसल्याने शाेध लागत नव्हता. आराेपीशी संबंधित अनेकांची चाैकशी करण्यात आली. ताे महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमावर्त्ती सोलापूर परिसरात दडी मारल्याची माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली.

मंगळवेढा तालुक्यात एका खेड्यातून अटक...

खबऱ्याने दिलेल्या माहितीची पडताळणी करून, स्थागुशाचे विशेष पाेलिस पथक साेलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका गावात धडकले. सापळा रचून माेठ्या शिताफीने आराेपी सुलतान गफार कुरेशी याला मंगळवारी अटक करण्यात आली. गुन्हा घडल्यापासून वास्तव्याची ठिकाणे बदलणाऱ्या आराेपींच्या मुसक्या अखेर पाेलिसांनी आवळल्या.

Web Title: Big news The absconding accused in the murder case in Latur was Arrested from Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.