मोठा दिलासा! औषधोपचाराने २७ बालके एचआयव्ही निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 04:30 PM2023-11-30T16:30:52+5:302023-11-30T16:31:52+5:30
लातूर जिल्ह्यात सात महिन्यांत आढळले २१५ एड्सग्रस्त रुग्ण
लातूर : एचआयव्ही बाधित मातेच्या पोटी जन्मणाऱ्या बालकांना संसर्ग होऊ नये म्हणून एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत नियमित तपासणी, औषधोचार करण्यात आल्याने सात महिन्यांमध्ये २७ बालके एचआयव्ही निगेटिव्ह झाली आहेत. जनजागृती अन् आरोग्य सुविधेमुळे एचआयव्ही निगेटिव्ह होणाऱ्या बालकांमध्ये वाढ होत आहे.
एचआयव्ही, एड्स आजाराचा शब्द उच्चारला तरी सर्वांच्या मनात भीती निर्माण होते. एचआयव्ही संसर्गित रक्ताचा वापर, एचआयव्ही संसर्गित सुई अथवा सिरिंजचा वापर, असुरक्षित शारीरिक संबंध आणि एचआयव्हीग्रस्त मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळास आजार अशा कारणांनी एड्सची पसरतो. दरम्यान, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्रासह जनजागृतीमुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य विभागाला यश येत आहे.
साडेसात वर्षांत १७५ बालके एड्समुक्त...
वर्ष - निगेटिव्ह बालक संख्या
२०१७-१८ -२२
२०१८- १९ - २२
२०१९- २० - २०
२०२०-२१ - २६
२०२१- २२ - ३८
२०२२- २३ - २०
एप्रिल ते ऑक्टोबर - २७
एकूण - १७५
साडेपाच वर्षांमध्ये २२९६ बाधित...
वर्ष - बाधित रुग्ण
२०१८- १९ - ५४०
२०१९- २० - ५४२
२०२०- २१ - २६४
२०२१- २२ - ३३२
२०२२- २३ - ४०३
एप्रिल ते ऑक्टो. - २१५
एकूण - २२९६
संसर्गाचा आलेख उतरला...
शासनाकडून आरोग्य तपासणी, चाचणी व उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात एड्स संसर्गाचा आलेख उतरत आहे. सन २०१८- १९ मध्ये बाधित रुग्णांची टक्केवारी ०.६४, २०१९- २० मध्ये ०.५२, २०२०-२१ मध्ये ०.४७, २०२१- २२ मध्ये ०.४३, २०२२- २३ मध्ये ०.४१ तर एप्रिल ते ऑक्टोबर अखेरपर्यंतच्या कालावधीत ०.५० टक्के बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
समाजाचा सहभाग, जनजागृती महत्त्वाची...
समाजाचा पुढाकार एचआयव्ही/ एड्सचा समूळ नाश ही यंदाची थीम आहे. एचआयव्हीचा संसर्ग राेखण्यासाठी प्रतिबंध हाच सर्वात चांगला उपाय आहे. त्यासाठी आणखीन जनजागृती होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात एचआयव्हीचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या सात महिन्यांत २१५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक.
५८६५ बाधितांवर मोफत उपचार...
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच उदगीर येथील सामान्य रुग्णालयात मोफत औषधोपचार दिले जातात. सध्या या दाेन केंद्रातून ५ हजार ८६५ एचआयव्ही बाधितांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.हा आजार टाळण्यासाठी मान्यताप्राप्त रक्तपेढीतील रक्ताचा वापर करावा. प्रत्येक वेळी नवीन सुई, सिरिंजचा वापर करावा. साथीदाराशी एकनिष्ठ रहावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी केले आहे.