जिल्हा परिषदेचा मोठा दिलासा! शाळा, ग्रामपंचायतींना आता वीजबिलाचा राहणार नाही ताण
By हरी मोकाशे | Published: May 20, 2023 08:07 PM2023-05-20T20:07:06+5:302023-05-20T20:07:39+5:30
लातूर जिल्ह्यात १५ व्या वित्त आयोगातून सौर सिस्टीम उभारणी
लातूर : अपेक्षेपेक्षा अधिकच्या वीजबिलामुळे ग्रामपंचायती, शाळा हैराण होतात. काही वेळेस तर बिलापोटी महावितरणकडून वीजपुरवठाही तोडण्यात येतो. या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने नवी मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, ग्रामपंचायतीत सौर सिस्टीम बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परिणामी, शाळा आणि ग्रामपंचायतींना वीजबिलाचा ताण राहणार नाही.
जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती असून, जिल्हा परिषदेच्या १२७८ शाळा आहेत. बहुतांश शाळांमध्ये वीजजोडणी आहे. शिवाय, विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे म्हणून संगणकही आहेत. दरम्यान, काही शाळांना अपेक्षेपेक्षा अधिक वीजबिल आल्यामुळे त्याचा भरणा करण्यात येत नाही. त्यामुळे महावितरणकडून वीजपुरवठा तोडला जातो. परिणामी, शाळेतील संगणक धूळ खात पडून राहतात. शिवाय, ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र असून, त्याद्वारे ऑनलाइन प्रमाणपत्र नागरिकांना दिले जातात. तसेच ऑनलाइन नाेंदीही केल्या जातात. मात्र, सातत्याने वीजपुरवठा खंडित होणे, बिल न भरल्याने महावितरणकडून वीज कनेक्शन तोडले जाते.
या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेनुसार जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, ग्रामपंचायत कार्यालयात सौर सिस्टीम सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे शाळा, ग्रामपंचायत कार्यालय २४ तास प्रकाशमान राहणार आहेत.
एककिलो वॉटची सौर सिस्टीम...
प्रत्येक शाळा, ग्रामपंचायतींसाठी एक ते दोन किलो वॉटची सौर सिस्टीम राहणार आहे. सन २०२२-२३ मधील १५व्या वित्त आयोगाचा अबंधित निधी एप्रिलमध्ये उपलब्ध झाला आहे. त्यातून हे सयंत्र उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या सिस्टीमवर पंखा, बल्ब, टीव्ही, संगणक सुरू राहतात. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांची सोय होणार आहे.
वीजविक्रीही करता येईल...
या सिस्टीममुळे शाळा, ग्रामपंचायतींना पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होईल. याशिवाय, सुटीच्या दिवशी शाळा, ग्रामपंचायत कार्यालय बंद राहिल्यामुळे वीज संचय होईल आणि महावितरणकडे वळती होईल. त्यामुळे शाळा, ग्रामपंचायतीस पैसेही मिळतील. लवकरात लवकर ही सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
अपारंपारिक ऊर्जेचा वापर...
सध्या वीज आणि बिलाची मोठी समस्या आहे. सौर सिस्टीम ही पर्यावरणपूरक असून, अपारंपरिक ऊर्जेचा वापर होईल. शिवाय, वीज खंडित होण्याची समस्या राहणार नाही. सीईओ अभिनव गोयल यांच्या संकल्पनेनुसार ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आल्या आहेत. लवकरच जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायती आणि शाळा सौर ऊर्जेवर प्रकाशमान होतील.
- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत