मोठा दिलासा! मांजरा प्रकल्पात येवा वाढतोय; ६.६११ दलघमी नवीन पाणी दाखल
By हणमंत गायकवाड | Published: July 10, 2023 03:43 PM2023-07-10T15:43:44+5:302023-07-10T15:44:30+5:30
प्रकल्प क्षेत्रात गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस...
लातूर : लातूर शहरासह कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर, लातूर एमआयडीसी आदी मोठ्या शहरांसह छोट्या-मोठ्या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यात ६.६११ दलघमी नवीन पाणीसाठा झाला आहे. प्रकल्प क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत १५१ मि.मी. पाऊस झाल्याने नवीन पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी या तारखेत नवीन येवा शून्य होता. यंदा मात्र ६.६११ दलघमी पाणी आल्याने लातूर शहरासह पाणीपुरवठा योजना असणाऱ्या गावांना दिलासा मिळाला आहे. मांजरा प्रकल्पाच्या वर अप्पर मांजरा आणि सांगवी येथे मध्यम प्रकल्प आहे. मांजरा प्रकल्पावरील हे दोन प्रकल्प भरल्याशिवाय पाणीसाठा होत नाही. हा दरवर्षीचा अनुभव आहे. यंदा मात्र प्रकल्प क्षेत्रामध्ये ५ जून रोजी रात्री एकाच दिवशी ५७ मि.मी. पाऊस झाला. तर आतापर्यंत १५१ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रकल्पात ६.६११ दलघमी पाणीसाठा झाला आहे.
प्रकल्प क्षेत्रात गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस...
गतवर्षी मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आजच्या तारखेत ११७ मि.मी. पाऊस झाला होता. पण त्यावर्षी पाणीसाठा जुनाच आजच्यापेक्षा जास्त होता. यंदा १५१ मि.मी. पाऊस झाला आहे. ३४ मि.मी. पाऊस गतवर्षीच्या तुलनेत अधिक झाला आहे.
प्रकल्पावरील वीज मोटारींचा पाणी उपसा बंद
मांजरा प्रकल्पाच्या वर नदीवर अनेक वीज मोटारींद्वारे उपसा सुरू होता. परंतु, ५ जुलै रोजी केज, कळंब, युसूफ वडगाव आदी मांजरा नदीच्या बॅकवॉटर परिसरामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे मांजरा प्रकल्पावरील वीज मोटारीद्वारे होणारा पाणीउपसा बंद झाला आहे.
प्रकल्पात २३.४८ टक्के जिवंत पाणीसाठा
मांजरा प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता २२४.०९९३ दलघमी आहे. त्यापैकी धरणात ८८.६८ दलघमी पाणी आहे. यातील ४१.५५ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. या जिवंत पाण्याची टक्केवारी २३.४८ टक्के आहे. त्यामुळे सध्या तरी चिंता नाही.
२२ स्क्वेअर चौरस कि.मी. पाण्याचे क्षेत्र...
मांजरा प्रकल्पावरील पाणलोट क्षेत्र लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यात आणि लातूर तालुक्यातील हरंगुळपर्यंत आहे. मांजरा आणि डावा उजव्या कालव्यातून हे पाणी लातूर जिल्ह्यापर्यंत येते. तसेच लातूर शहरासाठी पिण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे २२ स्क्वेअर चौरस कि.मी. पाण्याचे क्षेत्र आहे, अशी माहिती शाखा अभियंता सूरज निकम यांनी दिली.